ठाणे : जिल्ह्य़ातील ठाणे वगळता इतर महापालिकांना वाढीव पाणी पुरवठा करण्यात येतो. पण, मोठा आर्थिक हिस्सा असलेल्या ठाणे महापालिकेला वाढीव पाणी दिले जात नाही. तसेच खासगी गृहसंकुलांना परस्पर पाणी देऊन त्यांच्याकडून पैसे मिळत नाही, असे सांगत महापौर नरेश म्हस्के यांनी स्टेमच्या कारभारावर बुधवारच्या विशेष बैठकीत ताशेरे ओढले. ठाणे शहराला दहा दशलक्षलीटर इतका वाढीव पाणी पुरवठा करण्याचे तसेच खासगी गृहसंकुलांना परस्पर पाणी देण्याबाबतचे प्रस्ताव रद्द करण्याचे निर्देश त्यांनी स्टेम प्राधिकरणाला यावेळी दिले.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार स्त्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २१० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११० दशलक्षलीटर, एमआयडीसीकडून ११० दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ६५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरिकरण झाले असून घोडबंदर परिसरात मोठी गृहसंकुले उभी राहीली आहेत. त्यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागला असून नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहेत. त्यात पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्ती किंवा जलवाहीनी फुटल्यास नागरिकांना आणखी टंचाईचा सामना करावा लागतो. याबाबत सातत्याने नागरिकांकडून महापालिकेकडे तक्रारी येत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने स्टेमकडे वाढीव पाण्याची मागणी केली होती.