News Flash

ठाण्यापुढे नवे ठाणे!

ठाण्याच्या पलीकडे एका नव्या शहराची निर्मिती केली जाईल.

| September 4, 2015 02:54 am

ठाण्याच्या पलीकडे एका नव्या शहराची निर्मिती केली जाईल, अशी घोषणा तब्बल चार वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी केली होती. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्यापलीकडील मोकळी जमीन अधिग्रहित करून त्यावर नवी मुंबईच्या धर्तीवर टुमदार उपनगर वसवायचे, असा राजीव यांचा प्रस्ताव होता. या उपनगराला वाहतूक व्यवस्थेने जोडता येईल आणि ठाण्यावर आदळणारी लोकसंख्या काही प्रमाणात विभागली जाईल, असे राजीव यांचे म्हणणे होते. नवे ठाणे म्हणजे राजीव यांचा कल्पनाविलास आहे, अशी टीका तेव्हाही झाली होती. नवे शहर वसविणे हे मुळात महापालिकेचे काम नाही, त्यासाठी सिडकोसारखे प्राधिकरणच हवे, असे म्हणणे त्या वेळी काही नियोजनकर्त्यांनी ठासून मांडले. राजीव यांची बदली होताच त्यांनी मांडलेला नव्या ठाण्याचा हा प्रस्तावही मोडून पडला. राजीव यांच्या आग्रहास्तव महापालिकेच्या नगररचना विभागाने त्या वेळी तयार केलेले ढोबळ आराखडे फायलींमध्ये गुडूप झाले आहेत. राजीव यांना अपेक्षित असलेले आणि केवळ घोषणेपुरते उरलेले नवे शहर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्रत्यक्षात जरी येऊ शकले नसले तरी ठाण्याच्या पलीकडे आणि भिवंडी-कल्याणच्या मधोमध झपाटय़ाने विस्तारित जाणाऱ्या नागरीकरणाचा पट्टा आज नवे ठाणे याच नावाने ओळखला जाऊ लागला आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एका बैठकीत अवघ्या दहा दिवसांपूर्वी मांडण्यात आलेल्या प्रारूप आराखडय़ात या नव्या ठाण्याचा उल्लेख आला आहे. शासनाने २०१२ मध्ये मुंबई महानगर क्षेत्र अधिसूचित केले आहे. या क्षेत्रात जमीन वापर, पर्यावरण, साधनसंपत्ती व्यवस्थापन, गृहनिर्माण, उद्योग व गुंतवणूक यासाठी वेगवेगळे पट्टे तयार करण्याचे काम सध्या मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सुरू केले आहे. हे काम करत असताना भिवंडी तसेच आसपासच्या विभागासाठी स्वतंत्र प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून या परिसरातील विकासाची क्षमता लक्षात घेऊनच काही पावले उचलली जात आहेत. भिवंडी-निजामपूर महापालिकेचे कार्यक्षेत्र सद्य:स्थितीत फारच मर्यादित आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ करण्याचा प्रस्ताव असून माणकोली, नारपोलीयासारखा विस्तारित पट्टाही महापालिकेच्या अखत्यारीत आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
गोदामे.. यंत्रमाग ते विकास केंद्र
भिवंडीचा उल्लेख यापूर्वी यंत्रमागांचे शहर एवढय़ापुरताच मर्यादित असायचा. शेकडोंच्या संख्येने असलेल्या यंत्रमागाच्या उद्योगास गेल्या काही वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या वीज चोरीमुळे हे शहर यापूर्वीच बदनाम झाले आहे. हे कमी म्हणून की काय गेल्या काही वर्षांत या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा गोदामे उभी राहिली आहेत. जिल्हा प्रशासनाने मान्यता दिलेल्या गोदामांच्या दुपटीने याठिकाणी बेकायदा गोदामांची संख्या आहे. मुंबईस्थित बडय़ा कंपन्यांचा माल दररोज येथे रिता होत असतो. उरणनजीक असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरातून या भागात दररोज शेकडोंच्या संख्येन अवजड वाहनांची येजा असते. या बेकायदा गोदामांना काही स्थानिक पुढाऱ्यांचा राजाश्रय असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचीे वर्षांनुवर्षे याकडे डोळेझाक सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने याच सगळ्या पट्टय़ात नवे विकास केंद्र उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भिवंडीच्या अलीकडे पायगाव, खारबाव पट्टय़ात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर गृहप्रकल्पांची उभारणी सुरू आहे. यापैकी काही प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत सापडला आहे. असे असले तरी मोठय़ा प्रमाणावर मोकळ्या जमिनी उपलब्ध असल्याने बडय़ा गृहप्रकल्पांची या भागात चलती आहे. ग्रामपंचायतींची परवानगी घेऊन मोठय़ा प्रमाणावर इमारती उभ्या केल्या जात असल्याने दर वर्षी शेकडो घरांची निर्मिती या भागात होऊ लागली आहे.या पटय़ात गृह-प्रकल्पांची बांधणी करणाऱ्या विकसकांनी या परिसराचा उल्लेख नवे ठाणे असाच सुरू केला आहे. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने खारबाव-पायगाव पट्टय़ात नवे विकास केंद्र उभारण्याचा प्रस्तावही पुढे आणला आहे. रोजगाराचे विक्रेंद्रीकरण व्हावे या उद्देशाने या प्रकल्पाची आाखणी करण्यात आली आहे. शहरांना समर्थ बनवावे आणि प्रवासाचे अंतर कमी व्हावे यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आपल्या परिक्षेत्रात काही नवे औद्योगिक विभाग प्रस्तावित केले आहेत. त्यामध्येही भिवंडी तसेच आसपासच्या परिसराचा समावेश करण्यात आला आहे. राजीव यांना अपेक्षित असलेले नियोजित नवे ठाणे प्रत्यक्षात येऊ शकले नसले तरी ठाण्याच्या पलीकडे नागरीकरणाचा वेग लक्षात घेता ही प्रक्रिया केव्हाच सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.
घरांचे दर
खारबाव-पायगाव : प्रति चौरस फूट तीन ते चार हजार रुपये
भिवंडी शहर : पाच हजार रुपये
माणकोली : चार ते पाच हजार रुपये

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 2:54 am

Web Title: thane to next thane
Next Stories
1 प्रसंगी पर्यावरण नियम डावलून ठाण्याचा पुनर्विकास!
2 मुंब्रा येथे इमारत पाडण्यास स्थानिकांचा विरोध
3 ‘बाळगंगा’ गैरव्यवहार प्रकरणात तिघांना अटक
Just Now!
X