ठाणे शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेपाठोपाठ महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना दुकानासमोरील बेकायदा शेड्स काढण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे महापालिकेची कारवाई अटळ असल्याचे लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकानासमोरील बेकायदा शेड्स काढण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत सुमारे ११ हजार बेकायदा फलक तसेच बांधकामे स्वतहून काढण्यात आले आहेत.
ठाणे स्थानक, नौपाडा आणि पाचपखाडी या परिसरातील बहुतेक रस्ते अरुंद असून या रस्त्यालगत विविध व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. या भागात आधीच अरुंद रस्ते असताना दुकानामध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे हे रस्ते वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहेत. काही व्यापाऱ्यांनी या जागेत अतिरिक्त व्यवसाय थाटला आहे. ठाणे स्थानक परिसर, पोखरण रोड या भागात रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यानंतर मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमणांविरोधात मोहीम हाती घेतली जाणार आहे. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी दुकानासमोर बेकायदा शेड्स उभारल्या असून त्यापैकी अनेकजण शेड्सचा वापर व्यवसायासाठी करत आहेत. या शेड्स काढणार नाहीत अशा व्यापाऱ्यांना एक लाख रुपयांचा दंड आकारला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यामुळे खडबडून जागे झालेल्या व्यापाऱ्यांनी स्वतहून बांधकामे आणि शेड्स काढण्यास सुरुवात केली आहे. महापालिका मुख्यालयाजवळील दुर्गाविहार, उत्सव या नामांकित हॉटेल व्यावसायिकांसह ओपन हाउस भागातील खाऊगल्लीमधील व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील शेड्स काढल्या आहेत. त्यामध्ये प्रशांत कॉर्नर, कृष्णा मिठाई आणि सतरंज वेफर्स अशा नामांकित दुकानांचा समावेश आहे. याशिवाय, शहरातील महत्त्वाचे मार्ग असलेल्या गोखले आणि राम मारुती रोडवरील व्यापाऱ्यांनी शेड्स काढल्याचे चित्र आहे. आतापर्यंत सुमारे ११ हजार शेड्स आणि बांधकामे व्यापाऱ्यांनी स्वतहून काढली आहेत, अशी माहिती अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकाऱ्याने दिली.