पाच महिन्यांत दोन हजार कोटींचा व्यापार बुडाल्याचा दावा; ठाण्यातील २० टक्के नव्या व्यापाऱ्यांनी गाशा गुंडाळल्याची खंत

ठाणे : करोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या पाच-सहा महिन्यांत दोन हजार कोटी रुपयांचा व्यापार एकटय़ा ठाणे शहरातून बुडाल्याचा दावा येथील व्यापाऱ्यांनी केला आहे. शहरात करोना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिकेने जुलै-ऑगस्ट महिन्यात पुन्हा टाळेबंदीचे हत्यार उपसले. यामुळे आधीच संकटात सापडलेला व्यापार पूर्ण मोडून पडल्याचा दावा व्यापारी महासंघाने केला आहे. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या व्यापारात उतरलेल्या २० टक्के नव्या व्यापाऱ्यांनी गाशा गुंडाळल्याची खंतही या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

ठाण्यातील नौपाडा, गोखले मार्ग, पाचपाखाडी तसेच कळवा-मुंब्रा भागातील व्यापाऱ्यांची एक बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. शहरातील लहान-मोठय़ा ४० व्यापारी संघांचा एक महासंघ आहे. ठाणे व्यापार-उद्योग महासंघाच्या वतीने टाळेबंदी काळातील झालेले नुकसान आणि पुढील वाटचालीसंबंधी प्रमुख पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांशी या वेळी संवाद साधण्यात आला. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात मार्च महिन्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. या टाळेबंदीला जून महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने शिथिलता मिळत असताना जुलै-ऑगस्ट महिन्यात ठाणे जिल्ह्य़ात पुन्हा नव्याने टाळेबंदी जाहीर करण्यात आली. या कालावधीत दुकाने बंद राहिली खरी, मात्र ग्राहकांनी खरेदीसाठी काही प्रमाणात विविध नामांकित खरेदी-विRी संकेतस्थळांचा वापर सुरू केला. अशा ऑनलाइन खरेदीचा प्रभाव अजूनही कायम असल्याने डबघाईला गेलेला बाजार उभाच राहत नसल्याची खंत या बैठकीत अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

टाळेबंदीच्या काळात ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरांतील व्यापारी आणि उद्योजकांना तब्बल २ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे, असा दावा या बैठकीत करण्यात आला. इलेक्ट्रिक वस्तू, कपडे, चपलांची दुकाने, गृहउपयोगी वस्तूंची विRी करणाऱ्या व्यापाऱ्यांना धंदा बुडाल्याची ओरडही या वेळी करण्यात आली. नव्याने व्यवसायात उतरलेल्या २० टक्के व्यापाऱ्यांना याचा फटका बसणार असून त्यांच्यावर उद्योग आणि दुकाने बंद करण्याची वेळ येणार आहे. यापैकी अनेकांनी दुकाने बंदही केली आहेत, असा सूरही या बैठकीत उमटला. राज्य सरकारला यावर काही तोडगा काढण्याची गरज असल्याचे महासंघाचे महासचिव भावेश मारू यांनी सांगितले. येत्या आठवडय़ात पुन्हा बैठक घेऊ न व्यापार वाचविण्यासाठी काय करता येईल याबाबत दिशा ठरवली जाणार असल्याचेही ते म्हणाले.