दोन वर्षांत पावणेतीन लाखांची दंडवसुली; गतवर्षीच्या तुलनेत कारवाई दुप्पट

ठाणे : ठाणे वाहतूक विभागाने गेल्या दोन वर्षांत ई-चलन कारवाईमध्ये सातत्य राखले आहे. त्याद्वारे दोन हजार ५१५ जणांवर कारवाई करत २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नियमभंगाचे सीसीटीव्ही चित्रण आणि छायाचित्रांच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत २०१७च्या तुलनेत यंदा दुप्पट वाढ झाली आहे.

ई-चलन पद्धतीत नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करणे, झेब्रा रेषा, हेल्मेट आणि अन्य नियम मोडणाऱ्या चालकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवून, त्यांची छायाचित्रे टिपून, वाहन क्रमांकाच्या आधाराने संबंधित वाहनचालकांच्या पत्त्यावर दंडाची नोटीस पाठवली जाते. गेल्या दोन वर्षांत वाहतूक हे. येत्या वर्षांत ती अधिक प्रभावीपणे राबवली जाईल, असा विश्वास वाहतूक विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला आहे.

गेल्या दोन वर्षांत ई-चलन कारवाईच्या माध्यमातून ठाणे वाहतूक पोलिसांनी २ हजार ५१५ जणांवर कारवाई केली आहे. या माध्यमातून २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. २०१७ मध्ये ८२१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून १ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत नियम तोडणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत यंदाच्या वर्षी दुपटीने वाढ झाली असून २०१८ मध्ये १६९४ जणांवर कारवाई करत १ लाख ४७ हजार १०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही आणि छायाचित्रांद्वारे होणारी वाहनचालकांवरील कारवाई वेग धरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कारवाईचे स्वरूप

सिग्नलवर वाहन झेब्रा रेषेच्या पुढे नेणे, सिग्नल तोडून पुढे जाणे, सिट बेल्टचा नियम न पाळणे आणि हेल्मेट न घालणे यासारखे विविध नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे आणि वाहनांचे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून छायाचित्र टिपण्यात येते. ठाण्यात १८ वाहतूक केंद्रांमार्फत छायाचित्र काढून कारवाई केली जाते. छायाचित्रांतील वाहन क्रमांकावरून संबंधित वाहनचालकाचा पत्ता शोधून त्यावर वाहतुकीचे नियम तोडल्याची नोटीस पाठवण्यात येते. त्याद्वारे दंड भरण्यास सांगितले जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तीन हात नाका, कॅडबरी आणि नितीन जंक्शन या भागात लावण्यात आलेल्या १६ कॅमेऱ्यांद्वारे ही कारवाई केली जात आहे.

नियम तोडणाऱ्यांचे छायाचित्र टिपून कारवाई करण्यात ठाणे वाहतूक पोलीस सातत्याने सक्रिय आहेत. नियम तोडल्यास संबंधित वाहनचालकाच्या घरी वाहतूक बिट मार्शल नोटीस घेऊन जातात आणि दंड वसूल करतात. तर ठाणे शहराच्या बाहेरील व्यक्ती असेल तर टपालाद्वारे दंडाची नोटीस पाठवण्यात येते.

– अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक पोलीस विभाग

वर्ष     वाहनचालक          दंड (रु.)

२०१७      ८२१               १,३९,४००

२०१८   १६९४                 १,४७,१००