ठाणे वाहतूक पोलिसांचा नवा प्रस्ताव

ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या कामामुळे ठाणे, नवी मुंबईतील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी आता भिवंडी परिसरातील गोदाम मालकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. सद्य:स्थितीत भिवंडीतील गोदामे आठवडय़ाच्या ठरावीक दिवशी बंद असतात. उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून निघणारा अवजड वाहतुकीचा भार विभागला जावा यासाठी भिवंडी परिसरात असलेली गोदामे ग्रामपंचायतनिहाय आठवडय़ाच्या वेगवेगळ्या दिवशी बंद करण्याचा पर्याय वाहतूक पोलिसांनी पुढे आणला आहे. या भागातील गोदाम मालक संघटनेकडे यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात येणार असून ठाणे आणि नवी मुंबई परिसरांत वाहतुकीच्या नियोजनासाठी अतिरिक्त वॉर्डन पुरविण्याचे प्रस्तावही संबंधित महापालिकेकडून मंजूर करून घेण्यात येणार आहेत.

मुंब्रा बाह्य़वळण रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने गेल्या दोन आठवडय़ांपासून ठाणे, नवी मुंबईच्या रस्त्यांवर ठरावीक ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. आठवडाभरापूर्वी जेएनपीटीमधील वाहतूकदारांनी संप पुकारला होता. त्यामुळे अवजड वाहनांचा भार तुलनेने कमी होता. हा संप शनिवारी मिटला आणि सोमवारपासून पुन्हा एकदा अवजड वाहनांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. वाहतूक पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाचाही प्रभावीपणे वापर होत नसल्याने अवजड वाहनांची गर्दी ठाणे, नवी मुंबई, कल्याण या मार्गावर कधी कुठे कोंडी होईल, याचा नेम नसतो. हा तिढा सोडविण्यासाठी भिवंडीतील गोदाम मालकांना साकडे घालण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

भिवंडीतील वेगवेगळ्या ग्रामपंचायत हद्दीत शेकडोंच्या संख्येने गोदामे असून त्यातील बहुतांश गोदामे ही बेकायदा आहेत.

खाडीकिनारी अवैध पद्धतीने भराव टाकून उभारण्यात आलेल्या या गोदामांचा विषय नेहमीच वादग्रस्त ठरला असला तरी मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या कामामुळे याच गोदाम मालकांना आर्जव करण्याची वेळ आता पोलिसांवर आली आहे. ठाणे वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे तयार केलेल्या प्रस्तावानुसार येथील ग्रामपंचायत हद्दीप्रमाणे गोदाम बंद ठेवण्याचे वार बदलण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सद्य:स्थितीत बहुतांश भागात शुक्रवारी गोदामे बंद ठेवले जातात. त्यामुळे शुक्रवारी भिवंडीच्या दिशेने जाणारा अवजड वाहतुकीचा भार कमी असला तरी इतर दिवशी मात्र तो वाढतो. ग्रामपंचायत हद्दीनुसार गोदामे वेगवेगळ्या वारांना बंद राहिले तर हा भार विभागला जाऊ शकतो, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

टोलच्या भारामुळे बेशिस्तपणा वाढला

मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या कामामुळे ठाणे, नवी मुंबईतील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी प्रशासनाकडून एकीकडे प्रयत्नांची शर्थ सुरू असली तरी ऐरोली आणि मुलुंड या दोन टोलनाक्यांवर आकारण्यात येणाऱ्या टोल रकमेमुळे अवजड वाहनचालक अधिसूचनेत आखून दिलेल्या मार्गाचा अवलंब करत नसल्याचा निष्कर्ष खुद्द पालकमंत्री एकनाथ िशदे यांनीच काढला आहे. दोन टोल भरावे लागत असल्याने हा गोंधळ वाढत असल्याचा मुद्दा पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणला असून यातून या परिस्थितीचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे.