ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी-पनवेल वातानुकूलित लोकलसेवेचा शुभारंभ झाला आहे. या लोकलमुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल तसंच त्यांना गारेगार प्रवास अनुभवता येईल अशी अपेक्षा रेल्वेला होती. मात्र शुक्रवारी सकाळी ठाणे रेल्वे स्थानकावर वेगळंच चित्र पहायला मिळालं. पहिल्याच दिवशी एसी लोकल २५ मिनिटं उशिरा आली. ठाणे रेल्वे स्थानकावर सकाळी ९ वाजून १९ मिनिटांनी एसी लोकल येणं अपेक्षित होतं. मात्र ही लोकल पहिल्याच दिवशी तब्बल २५ मिनिटं उशिरा आली. त्यात स्टेशनवर गर्दी असल्याने प्रवाशांची एकच झुंबड उडाली. अनेक प्रवासी एसी लोकलचं तिकीट नसतानाही त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता.

सकाळच्या वेळी अनेकजण कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. यावेळी एसी लोकल आली असता त्याच्या तिकीट दराची कल्पना नसणारे सगळे प्रवासी त्यामध्ये चढले आणि एकच गोंधळ उडाला. लोकलचे दरवाजे बंद होत नसल्याने लोकल बराच वेळ स्थानकावर उभी होती. या सगळ्याचा परिणाम वेळापत्रकावर झाल्यामुळे इतर लोकल २० ते २५ मिनिटं उशिराने धावत होत्या. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना नियंत्रणात आणताना आरपीएफच्या नाकी नऊ आले होते.

ऐरोलीमध्ये असणाऱ्या आयटी कंपन्यांचे अनेक कर्मचारी लोकल ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळेच सकाळच्या वेळेत हार्बर मार्गावर चांगलीच गर्दी असते. मात्र आज एसी लोकलमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने काही लोकल रद्द करण्यात आल्या. एसी लोकल प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा लोकलसंदर्भात किंवा त्यांच्या तिकीटच्या दरांसंदर्भात माहिती देणारे रेल्वेचे कर्मचारी उपस्थित नसल्याने प्लॅटफॉर्मवरील अनेकजण एसी लोकलमध्ये शिरले. गर्दी इतकी होती की पुरुषांच्या डब्यात तर अनेकजण साध्या लोकलप्रमाणे दरवाजात लटकत होते. मात्र स्वयंचलित दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय लोकल सुरु न होणारे तंत्रज्ञान असल्याने गाडी बराच वेळ एकाच जागी उभी होती. त्यानंतर गाडीला विशेष तिकीट घ्यावे लागते हे सांगण्यात आल्यानंतर पुन्हा गाडीमधून खाली उतरण्यासाठी गोंधळ सुरु झाला. या सर्व गोंधळातच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर साधी लोकल गाडी आल्याने पुन्हा पुलावरुन तिकडे जाण्यासाठीही धावपळ झाली. एकंदरितच एसी लोकलने हार्बर लाइनवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा पहिल्याच दिवशी घाम काढल्याचे चित्र ठाणे स्थानकात पहायला मिळाले.

रेल्वेचे अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्याने हा गोंधळ झाल्याचे आरोप काही प्रवाशांनी केला आहे. तर रेल्वे व्यवस्थापनाला विशेष ट्रेनची माहिती देण्यासाठी आणि गर्दीला संभाळण्यासाठी अतिरिक्त सीआरपीएफ जवानांची नेमणूक करणे गरजेचे होते असंही काही प्रवाशांनी सांगितलं.