ठाणे वाहतूक शाखेची विशेष मोहीम; दोन दिवसांत २३५ वाहनमालकांकडून दंड वसूल

ठाणे : महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन दिवसांत २३५ वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहरातील सेवा रस्त्यांवरील बेकायदा पार्किंगला लगाम बसून येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

ठाणे शहरातून मुंबई-नाशिक तर घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद असे महामार्ग जातात. या महामार्गांवर शहरातील वाहनांची सतत वर्दळ असते. याशिवाय, अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यातच या दोन्ही महामार्गांवर मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे महामार्गांवर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे अनेकजण कोंडी टाळण्यासाठी सेवा रस्त्यांचा वापर करू लागले आहेत. परंतु सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी केली जात असून या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे. त्यातच सेवा रस्त्यांलगत गॅरेज, जुनी आणि नवीन वाहन विक्रीची दुकाने असून येथील वाहने सेवा रस्त्यांवरच उभी केली जात असल्याने कोंडीत भर पडत आहे. मध्यंतरी अशा वाहनांविरोधात महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई सुरू केली होती. परंतु काही दिवसांतच ही मोहीम थंडावली. दरम्यान, ठाणे वाहतूक शाखेचे नवे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी आता पुन्हा अशा वाहनांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये गेल्या दोन दिवसांत सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी करणाऱ्या २३५ मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये ठाणे वाहतूक शाखेच्या कोपरी युनिटने ४, नौपाडा युनिटने ६४, वागळे युनिटने १३, कापुरबावडी युनिटने ७१, कासारवडवली युनिटने १६ आणि राबोडी युनिटने ६४ वाहनांवर कारवाई केली आहे.

ठाणे शहरातील महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर बेकायदा वाहन पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी या रस्त्यांवर बेकायदा वाहने पार्किंग करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून त्यामध्ये २३५ वाहनमालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढे ही कारवाई सुरूच राहणार आहे. – बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा