ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या समितीवर सदस्यांची निवड करण्याचा मार्ग तब्बल दीड वर्षांनंतर अखेर सुकर झाला आहे. समितीच्या सदस्यपदाकरिता २० जूनला निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय वादात आणि न्यायालयीन फेऱ्यात सापडलेली परिवहन समिती स्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेली अनेक वर्षे परिवहन समितीवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या वर्षी मात्र ही समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली होती. महापालिकेतील संख्याबळ पाहता या समितीवर शिवसेनेचे वर्चस्व राहील, असे चित्र आहे. दरम्यान, नव्या सदस्यांच्या निवडप्रक्रियेत सर्वपक्षीयांकडून यंदा कोणते नवे चेहरे पुढे आणले जातात, याकडे सर्वाचे लक्ष लागले असून उपक्रमाच्या कामकाजात त्यामुळे काही सकारात्मक बदल घडतील का, हा प्रश्न यंदाही कायम आहे.
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेने सत्ता काबीज केली. मात्र राजकीय वाद आणि न्यायालयीन फे ऱ्यामुळे स्थायी समिती वगळता अन्य एकही समिती गठित होऊ शकली नव्हती. त्याचप्रमाणे परिवहन समितीतील सदस्यांचा कार्यकाळ संपताच ते कालांतराने निवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी अर्जही दाखल केले होते. मात्र तिथे एकाही नवीन सदस्याची निवड होऊ शकली नव्हती.२० जूनला परिवहन समिती सदस्यपदाकरिता निवडणूक घेण्यात येणार असून त्यासाठी १७ जूनला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ठेवण्यात आली आहे.