कित्येक वर्षांपासून कार्यरत असूनही ठाणेकर प्रवाशांचा विश्वास कमवू न शकलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने (टीएमटी) आता ही बाब गांभीर्याने घेतली आहे. महापालिकेची परिवहन सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी टीएमटी प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर संपर्क साधून प्रवाशांना बससेवेचे वेळापत्रक, बस भाडे याखेरीज बससेवेशी संबंधित अन्य माहिती मिळू शकणार आहे. टीएमटीच्या एकूण बसफेऱ्या, मार्ग, थांबे, वेळापत्रक याची एकत्रित माहिती कुठेच उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अनेकदा अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या पाश्र्वभूमीवर १८००२२९९०१ या क्रमांकाची हेल्पलाइन सुविधा टीएमटी प्रशासनाने सुरू केली आहे. प्रवाशांना हव्या ती माहिती या हेल्पलाइनवरून उपलब्ध होईल, अशी माहिती परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिली.