वेगवान बाइकस्वारांच्या कसरती, प्रेमी युगुलांमुळे स्थानिक हैराण

ठाणे शहरातील शांत, निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपवन परिसरात पुन्हा एकदा बाइकस्वारांच्या वेगवान आणि जीवघेण्या कसरती, शर्यती सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे, या ठिकाणी पालिकेने छटपूजेसाठी उभारलेला बनारस घाट आता प्रेमी युगुलांचे भेटीचे ठिकाण ठरू लागला असून त्यांच्या अश्लील चाळय़ांमुळे सर्वसामान्यांचे येथून फेरफटका मारणे कठीण बनले आहे. हा ताप कमी की काय, या परिसरात आता दिवसाढवळय़ा तरुणांच्या मद्यपाटर्य़ा रंगू लागल्या आहेत.

उपवन तलाव परिसरात असलेली शांतता अनुभवण्यासाठी नागरिक तलावाकाठी मोठय़ा संख्येने येत असतात. तरुणांचे बेताल वर्तन, व्यसन करून तलावाकाठी धिंगाणा घालण्यामुळे ही शांतताच नाहिशी झाली आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवली असली तरी, मद्यपी तरुणांनी उपवन मैदानाकडील आतील परिसराला आपला अड्डा बनवला आहे. तारेचे कुंपण ओलांडून उडय़ा मारत तरुण सेल्फी काढण्यासाठी तलावाच्या काठावर उतरतात. या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र तरुणांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास ते अरेरावी करतात, असे येथील एका सुरक्षारक्षकाने सांगितले. सायंकाळी अंधार झाल्यावर नीळकंठ टॉवरजवळच्या उपवन मैदानात तरुण दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

उत्तर भारतीयांच्या छटपूजेसाठी उपवन तलाव परिसरात तलावात उभारण्यात आलेल्या बनारस घाटावर प्रेमी युगुलांची गर्दी असते. नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी तलावाच्या काठी स्वतंत्र जागा करण्यात आलेली आहे. परंतु, सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रेमी युगुलांचे असभ्य वर्तन पाहून दुरूनच परतावे लागते, असे येथे नियमित येणारे भालचंद्र देसाई यांनी सांगितले. लहान मुलांना सायंकाळी फिरायला घेऊन यायचे असल्यास गणेश मंदिरापर्यंतच परत फिरावे लागत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

उपवन परिसरात प्रशस्त रस्ते असल्याने या ठिकाणी दुचाकीस्वार कसरती करत असतात. वेगाने दुचाकी चालवत कसरती करत असल्याने प्रभातफेरीसाठी या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये धास्ती असते. दुचाकीस्वारांविषयी तक्रार करण्यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे मदत क्रमांक देण्यात आला असला तरी या परिसरात कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.