प्लास्टिकबंदीमुळे विक्रेत्यांसमोर प्रश्न

ठाणे : नोकरदार महिलांची गरज हेरून ठाण्यात ठिकठिकाणी सुरू झालेला चिरलेल्या भाज्यांच्या विक्रीचा व्यवसाय प्लास्टिकबंदीमुळे अडचणीत सापडला आहे. आतापर्यंत प्लास्टिकच्या हवाबंद पिशव्यांत भरून विकल्या जाणाऱ्या चिरलेल्या भाज्या प्लास्टिकबंदीनंतर कशातून द्यायच्या, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. काही जणांनी कागदी पिशव्यांचा पर्याय वापरून पाहिला. मात्र या पिशव्या भाज्यांच्या ओलाव्यामुळे कूचकामी ठरत आहेत. त्यामुळे आता पुठ्ठा किंवा जाड कागदाच्या पिशव्यांच्या वेष्टनाचा विचार पुढे येत आहे. अर्थात यामुळे चिरलेल्या भाज्यांचे दर वाढण्याची चिन्हे आहेत.

भाज्या निवडण्यासाठी वेळ मिळत नाही व ऐन वेळी हॉटेलांतून ‘पार्सल’ मागवणे परवडत नाही, अशा स्थितीत चिरलेल्या भाज्या आणून त्या घरात शिजवण्याचा पर्याय ठाण्यात लोकप्रिय ठरला आहे. ठाणे स्थानक परिसर, नौपाडा, हिरानंदानी, जांभळी नाका अशा विविध ठिकाणी चिरलेल्या भाज्यांचे स्टॉल पाहायला मिळतात. घाऊक बाजारातील ताजी भाजी स्वच्छ करून, चिरून त्याची हवाबंद पाकिटे बनवून ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. परंतु प्लास्टिकबंदीनंतर या विक्रेत्यांसमोर भाज्या कशातून द्यायच्या, असा प्रश्न उभा राहिला आहे.

बंदच्या पहिल्या दिवशी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाईचा बडगा उगारल्याने अनेक भाजी विक्रेत्यांनी त्या दिवशी भाज्यांची विक्री बंद ठेवली होती. सोमवारी मात्र नौपाडय़ातील काही विक्रेत्यांनी चिरलेल्या भाज्या कागदी पाकिटांमधून विक्रीसाठी ठेवल्या. परंतु भाज्यांमधील ओलाव्यामुळे ही पाकिटे भिजून फाटली. ग्राहकांनाही हा पर्याय विश्वासू वाटत नसल्याने हा प्रयोग पुरता फसल्याची प्रतिक्रिया भाजी विक्रेते रवी कुर्डेकर यांनी दिली.

भेंडी, गवार, मेथी, फ्लॉवर, पालक, फरसबी, कोबी, अशा अनेक भाज्या २०० ग्रॅम वजनाच्या बंद पाकिटांमध्ये मिळतात. दोन दिवसांपूर्वी या भाज्यांचे दर २० ते ३० रुपये एवढे होते. मात्र प्लास्टिकबंदी आणि कागदी पिशव्यांचा प्रयोग फसल्याने आता या भाज्या पुठ्ठय़ांच्या वेष्ठनात देण्याचा विचार भाजी विक्रेते करत आहेत. पुठ्ठय़ाचा पर्याय प्लास्टिक आणि कागदाच्या तुलनेत महाग ठरल्यामुळे भाज्यांचे दर वाढविण्याशिवाय कोणताही मार्ग उरला नसल्याचे विक्रेते सांगतात.