दिवा कचराभूमीलगतच्या खाडीत सर्रास विल्हेवाट

ठाणे : ठाणे शहरातून दररोज निर्माण होणाऱ्या शेकडो मेट्रिक टन कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी गेल्या काही महिन्यांपासून हा कचरा दिवा कचराभूमीलगच्या खाडीकिनाऱ्यावरील खारफुटींवर रिता केला जात आहे. यावरून पर्यावरणप्रेमी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दिवा कचराभूमीच्या मागच्या बाजूला खाडी आहे. या कचराभूमीची क्षमता संपली असून येथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे खाडीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. तसेच खाडीवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरातील तिवरांना धोका निर्माण झाला आहे. क्षेपणभूमीच्या काही अंतरावर मोठय़ा प्रमाणात चाळी उभ्या राहिल्या असून खाडीच्या पाण्याचा प्रवाह कचऱ्यामुळे रोखला गेल्यास पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. तसेच कचरा टाकणे थांबले नाही तर कांदळवन नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, यासंदर्भात पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संपर्क साधला असता, ही जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाची असल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

स्थलांतराचा प्रश्न कायम

दिव्यातील कचराभूमीवर लागणाऱ्या आगी आणि या कचराभूमीची क्षमता संपुष्टात आल्यामुळे या कचराभूमीचे स्थलांतर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. दरवेळी निवडणुका जवळ आल्यानंतर कचराभूमीच्या स्थलांतराची आश्वासने देण्यात येतात. तसेच ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी स्थलांतरासाठी तरतूदही करण्यात येते. मात्र, यावर अद्याप कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

खाडी मार्गात कचरा टाकल्याने पाण्यात गाळ तयार होतो. या गाळामुळे पाण्याच्या प्रवाहात अडचण निर्माण होते. प्रवाहात अडचण निर्माण झाल्याने पूर येण्याची शक्यता असते.

– सुरभी वालावलकर,  पर्यावरण अभ्यासक