शहराच्या मध्यवर्ती भागासोबत आता नव्या ठाण्यातही पाणी साचण्याचे प्रकार

ठाणे : नियोजनाच्या अभावामुळे उंच-सखल बनलेल्या जुन्या ठाणे शहरात दर वर्षी पावसाळय़ात पाणी साचण्याचे प्रकार होत असताना आता नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातही पाणी साचू लागले आहे. नियोजनबद्ध परिसर अशी या भागाची ओळख निर्माण केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात पायाभूत सुविधांच्या आखणीपूर्वीच बडय़ा प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याची घाई केली जात असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे निरीक्षण आहे.

ठाणे महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या १३ सखल ठिकाणांमध्ये घोडबंदर परिसरातील आयसीआयसीआय बँक तसेच कासरवडवली भागातील डी मार्ट परिसराचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात उन्नती वुड्स, विजय गार्डन आणि हावरे सिटी या गृहसंकुलांच्या परिसरात अक्षरश पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असून या ठिकाणी अनेक भागांत गटारांची व्यवस्थाही महापालिकेने उभी केलेली नाही. काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून बिल्डरांना पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी वाढीव चटई क्षेत्र बहाल करण्यात आले असले तरी रस्ते, गटारे अशी कामे अनेक भागात अत्यंत मंद गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. कासरवडवली भागातील हावरे सिटी आणि आसपासच्या परिसरात तर पायाभूत सुविधांचे तीनतेरा वाजले असल्याने हजारोंच्या संख्येने येथे राहावयास आलेले रहिवासी त्रस्त झाले आहेत.

शहरात पाणी साचणारी १३ ठिकाणे असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. चार तासांपेक्षा जास्त वेळ सहा इंचांपर्यंत पाणी साचत असेल तर त्या भागाचा पाणी साचणाऱ्या यादीत समावेश करण्याचा शासनाचा निकर्ष आहे. त्याआधारे ही यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. प्रत्यक्षात या १३ ठिकाणांपेक्षाही जास्त ठिकाणी पाणी साचते. मात्र त्यातही यंदा सहा नवीन ठिकाणे आढळून आली आहेत. पाणी साचत असल्याबद्दल गेल्या दीड महिन्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे १५५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये माजिवाडा येथील आयरिक्स इमारत, वाघबीळ येथील विजय गार्डन, गायमुख येथील नागला बंदर, पातलीपाडा येथील महापालिका शाळा परिसर, माजिवाडा येथील राजधानी हॉटेल परिसर, वाघबीळ येथील भूमीएकर परिसर सोसायटी या ठिकाणांचा समावेश आहे.

पाणी तुंबण्याची कारणे..

’ ठाणे शहरात एका तासात ५० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला तर तितके पाणी वाहून नेण्याची वाहिन्यांची क्षमता नाही.

’ नाले आणि गटारे साफ नसतील आणि एका तासात ३५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला तर पाणी साचते.

’ गटार आणि नाल्यांची बांधणी करताना ते उपलब्ध जागेनुसार वळणदार पद्धतीने तयार करण्यात आले. त्यामुळेही पाण्याचा निचरा होण्यास विलंब होतो.

’ घोडबंदर भागात नाल्याचे पाणी वाहून नेण्यासाठी मुख्य रस्त्याखाली छोटय़ा वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. मात्र त्यात डोंगरातील माती किंवा कचरा अडकला तर पाणी खाडीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे घोडबंदर भागात पाणी साचते.

’ काही गृहसंकुलांचे परिसर उंच-सखल भागात असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचते.