स्थानक परिसरातील वाहनतळाच्या कामाला सुरुवात; जूननंतर ९०० दुचाकी उभ्या करण्याची व्यवस्था

आशीष धनगर, ठाणे</strong>

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला अर्धवट उभारलेल्या वाहनतळाच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. रेल्वेने या कामासाठी चार कोटी ७९ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देऊ केला आहे. जूनअखेपर्यंत काम पूर्ण करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. वाहनतळात ९०० दुचाकी उभ्या राहू शकणार आहेत.

ठाणे स्थानकातून रोज सहा लाखांहून अधिक प्रवासी रोज ये-जा करतात. त्यामुळे स्थानक परिसरात बेकायदा पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी नित्याचीच आहे. रेल्वे स्थानक परिसरात दुचाकीने येणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने २०१५ मध्ये येथे दुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ठाणे महापालिकेची आर्थिक मदत न घेण्याचा निर्णय झाला होता. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यासाठीरेल्वे प्रशासनातर्फे  साडेपाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र पुढच्या कामासाठी निधी नसल्याने कंत्राटदाराने काम बंद केले. अखेर रेल्वे प्रशासनातर्फे वाहनतळासाठी ४ कोटी ७९ लाखांचा निधी उपलब्ध केला असून पुढच्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनतळाची क्षमता वाढणार असून या जागेत ९०० अतिरिक्त दुचाकी उभ्या करता येणार आहेत. हे काम जूनअखेर पूर्ण केले जाणार आहे.

वाहनतळाचे स्वरूप

ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकच्या बाजूला सुमारे ५४०० चौरस मीटरच्या जागेवर तळ अधिक दोन मजल्यांचे वाहनतळ उभारले जात आहे. एकूण दोन हजार दुचाकी या वाहनतळात उभ्या करता येणार आहेत. वाहनतळ ठाणे महापालिकेच्या सॅटिस पुलाला जोडले जाणार आहे. त्यामुळे वाहन पार्क केल्यानंतर थेट फलाटांच्या दिशेने जाणे सोयीचे ठरणार आहे. १२ तासांसाठी ३० रुपये आकारले जाणार आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकातील वाहनतळासाठी ४ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढच्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली असून जूनअखेपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे.

– अनिल कुमार जैन,  वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे