महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असतानाच दुसरीकडे मात्र शहरातील विविध भागांत नागरिक मुखपट्टीविनाच फिरत असल्याचे चित्र आहे. शहरातील आंबेघोसाळे तलाव, उपवन, तलावपाळी, नितीन कंपनी उड्डाणपुलाखालील उद्यान, बाराबंगला तसेच इतर परिसरांत फेरफटका मारण्यासाठी येणारे अनेक नागरिक मुखपट्टीविनाच फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांमुळे करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत असून महापालिका प्रशासनानेच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. असे असतानाच शहरातील उद्यान, तलाव तसेच बाराबंगला परिसरात सकाळच्या वेळेत फेरफटका मारणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असतो. फेरफटका मारण्यासाठी येणारे काही नागरिक करोना नियम पाळत असले तरी काही नागरिक मात्र करोना नियम पायदळी तुडवीत असल्याचे चित्र दिसून येते. अनेक जण मुखपट्टीविनाच या ठिकाणी फेरफटका मारत असतात. काही नागरिक मुखपट्टी वापरतात. मात्र, ती हनुवटीच्या खाली असते. ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने करोनाचा सर्वाधिक धोका त्यांना असतो. मात्र, या विनामुखपट्टी फिरणाऱ्यांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.

आंबेघोसाळे तलाव येथे विनामुखपट्टी फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घोसाळे तलाव परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेने महापालिकेकडे केली होती. त्यानंतर महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या तलाव परिसरात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, संबंधित विभागाचे पथक तिथे कारवाईसाठी फिरकतच नसल्याचा आरोप संस्थेने केला आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शुक्रवारपासून महापालिकेची विविध पथके शहरात कारवाईसाठी नेमण्यात आली आहेत. त्यानुसार आता विनामुखपट्टी फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल. – संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका