ठाण्यातील महिलेचा अनोखा उपक्रम
गणेशाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी भाद्रपद सप्तमीला गौरीचे घराघरात स्वागत होत असते. गणेशाची ज्या भक्तिभावाने, उत्साहात, थाटामाटात पूजा केली जाते. त्याचप्रमाणे गौरीची मनोभावे प्रतिष्ठापना केली जाते. घरोघरी महिला माहेरास येणाऱ्या गौरीच्या स्वागताची तयारी अतिशय उत्साहाने करतात. ठाण्यातील शैलजा शिराळ या गेली तीन वर्षे आपल्या घरी गौरीच्या स्वागतासाठी भातुकलीचा संसार मांडून सजावटीत खेडेगाव रेखाटत आहेत.
मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात गावातील जीवन अनुभवायला कुणालाच सवड नाही. मात्र शैलजा शिराळ यांनी गौरीसाठी केलेल्या सजावटीत खेडेगावाची दिनचर्या मांडून खेडेगावाचे दृश्यात्मक दर्शन घडवले आहे. जातं दळणाऱ्या महिला, पापड लाटणारी आई आणि ही वाळवणं सुकवताना अभ्यासात मग्न झालेली मुलगी, मिरच्या कुटणाऱ्या महिला, धान्य पाखडणे, पाटा-वरवंटय़ावर वाटण वाटणे, चुलीवर भाकऱ्या थापणे, विहिरीतून आडाचे पाणी काढणे, तुळशी वृंदावनाची पूजा करणे, वासुदेवाच्या झोळीत धान्य देणे, बैलजोडीला शेतीवर घेऊन जाणे यांसारखी दैनंदिन कामे खेडेगावातच पाहायला मिळतात. गौरीची प्रतिष्ठापना करून शैलजा शिराळ आणि त्यांच्या मुलींनी सजावटीसाठी स्वत:चे कौशल्य वापरून आपल्या ठाण्यातील घरात खेडेगाव साकारला आहे. सजावटीसाठी पाटा, वरवंटा, पितळेची हंडा, कळशी यांसारख्या काही भातुकलीच्या खेळात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा संग्रह त्यांनी पुण्यातील तुळशीबाग येथून केला आहे. पुठ्ठय़ापासून विहार, तुळशी वृंदावन तसेच केरसुणीच्या काठय़ांपासून झावळ्यांचे भासेल असे घर तयार करण्यात आले आहे.
आपल्या संग्रहात सजावटीसाठी लागणाऱ्या अनेक सुबक वस्तू असतात, मात्र त्याचा सुयोग्य उपयोग प्रत्येकालाच करता येतो असे नाही. शैलजा शिराळ यांनी गौरीपूजनाचे औचित्य साधून त्यांच्या संग्रहातील वस्तूंनी केलेल्या सजावटीत खेडगावाचे जिवंत चित्र उभे केले आहे. मुंबईतच वास्तव्यास असलेल्या, खेडगाव न अनुभवणाऱ्या लोकांना तसेच इतर धर्मीय लोकांना केलेली ही सजावट विशेष अप्रुप वाटते. लहान मुलांना गाव कसा असतो, ते या सजावटीतून त्यांना उमजते असे शैलजा शिराळ यांनी सांगितले.