निवडणूक अर्ज रोखण्यासाठी मिरची पुडीसह महिलांचा पहारा

टक्कर देण्यासाठी मुंबई, ठाण्यातून शिवसैनिकांची कुमक

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या संघर्ष समितीच्या निर्णयाने आता संघर्षमय वळण घेतले असून गावांमधून एकाही उमेदवाराने अर्ज भरू नये, यासाठी समितीच्या महिला कायकर्त्यां प्रभाग कार्यालयांबाहेर मिरचीची पूड हातात घेऊन पहारा देत आहेत; तर निवडणूक लढवण्याच्या निर्धाराने शिवसेनेनेही कंबर कसली असून संघर्ष समितीला टक्कर देण्यासाठी मुंबई, ठाण्यातून शिवसैनिकांची कुमक मागवली असून पक्षाच्या आमदार आणि खासदारांकडे या गावातील प्रत्येकी पाच प्रभागांची जबाबदारी सोपवण्याची तयारी चालवली आहे.

संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली २७ गावांतून पालिका निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांना समर्थन दिले आहे. मात्र, शिवसेनेने विरोधी भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरावयास जाणाऱ्या उमेदवारांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेका, असे आवाहन संघर्ष समितीच्या नेत्यांनी जाहीरपणे केले आहे. त्यानुसार २७ गावांतील प्रभाग कार्यालयांबाहेर संघर्ष समितीचे कार्यकर्ते तळ ठोकून आहेत.

दरम्यान संघर्ष समितीचा विरोध मोडून काढण्यासाठी शिवसेनेनेही ‘अरे ला कारे’ने उत्तर देण्याचे ठरवले आहे. मंगळवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत २७ गावांमधील निवडणुकीचा मुद्दा चर्चेला आला असता मुंबई, ठाणे तसेच उपनगर परिसरातील आमदार, खासदार, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुखांची एक फळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

या बैठकीत कल्याण डोंबिवलीतील पाच प्रभाग मिळून एक विभाग प्रमुख नेमण्यात आला असून त्यावर अंकुश आमदारांचा असणार आहे. मुंबई तसेच अंबरनाथ बदलापूर येथील आमदार, खासदार उमेदवारांना प्रचाराविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेवणार आहेत. यामुळे या निवडणूकीची सर्व सुत्रे यंदा प्रथमच मातोश्री व सेना भवनावरुन हलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बंडखोरांना मातोश्रीचे आमंत्रण

सेनेमध्ये अंतर्गत नाराजी मोठय़ा प्रमाणावर असल्याने हे नाराज उमेदवार बंडखोरी करतील. या बंडखोरांना काही करून थांबवा. त्यांचे काही म्हणणे असेल तर त्यांना मातोश्रीवर घेऊन या. मी त्यांची समजूत घालेन, असे उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांना सक्त निर्देश दिले आहेत. एकाही प्रभागात बंडखोरी होता कामा नये असेही त्यांनी बजाविले आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा मोठा फटका पक्षाला बसला होता. या पाश्र्वभूमीवर यंदा बंडखोरी थोपविण्याचे आदेश उद्धव यांनी दिले आहेत.