13 November 2019

News Flash

ठाण्यात २० लाखांना बिबट्याची कातडी विकण्याचा प्रयत्न, चौघांना अटक

येऊर वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार आणि त्यांच्या टीमने सापळा रचत चौघांना अटक केली

(छायाचित्र: दीपक जोशी)

२० लाख किंमतीची बिबट्याची कातडी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. येऊर वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार आणि त्यांच्या टीमने सापळा रचत बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या चौघांना अटक केली. राजेंद्र पवार यांना कारवाई केल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे. बुधवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

‘आम्हाला आमच्या सुत्रांकडून चार जण बिबट्याची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर आम्ही सापळा रचला आणि येऊरच्या गेटबाहेर कार थांबवली. कारची तपासणी केली असता बिबट्याची कातडी सापडली’, अशी माहिती राजेंद्र पवार यांनी दिली आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे बशीर अहमद पठाण, जावेद दाऊद पठाण, किरण राऊत आणि मधुकर कंक अशी आहेत. हे सर्व रायगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. चौकशी केली असता आरोपांनी रायगड जिल्ह्यातून बिबट्याची कातडी मिळवल्याची कबुली दिली. तसंच २० लाखांना विकण्यासाठी चाललो होतो असंही सांगितलं. पोलिसांनी चौघांवर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

First Published on June 20, 2019 6:29 pm

Web Title: thane yeoor forest department leopard skin four arrested rfo rajendra pawar sgy 87