स्मार्ट होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कुशीत कोणत्याही प्राथमिक सुविधांचा मागमूस नसणारे दोन पाडे आहेत. येऊरच्या डोंगरकुशीत असलेल्या या पाडय़ांवर जाण्यासाठी धड रस्ता नाही. त्यामुळे कुणी आजारी पडले तर त्याला चादरीच्या झोळीत टाकून वाहून आणण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पाडे महापालिकेच्या हद्दीत असले तरी जागा वन खात्याची आहे. जागेच्या या वादामुळे अद्याप वीज या वस्त्यांपर्यंत पोहोचू शकलेली नाही. पाण्याच्या नावानेही शिमगा आहे. महानगराच्या वेशीवरचे हे आदिवासी मोठय़ा आशेने न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत…

देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली, पण अजूनही अनेक गावपाडय़ांपर्यंत वीज, पाणी आणि रस्ते अशा मूलभूत सुविधा पोहोचू शकलेल्या नाहीत. ठाणे-पालघरमधील दुर्गम डोंगरी भागातील अनेक वस्त्यांचे हे वास्तव आहेच, पण मुंबई-ठाणे शहराला खेटूनच आणि संजय गांधी उद्यानाचा भाग असलेल्या येऊरमधील जांभुळ व वणी या दोन गावपाडय़ांचीही काहीशी अशीच अवस्था आहे. येऊरमधील हे दोन्ही पाडे वीज, पाणी आणि रस्ते अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या पाडय़ातील आदिवासी बांधव आजही अंधारमय जीवन जगत आहेत. याच येऊरमध्ये बडय़ा धनदांडग्यांचे बंगले असून तिथे मात्र या सुविधा पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे, बडय़ा धनदांडग्यांप्रमाणे येथील आदिवासी बांधवही ठाणे महापालिकेत मालमत्ता कर भरतात, पण तरीही त्यांना अशा मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. वनविभाग आणि अन्य शासकीय यंत्रणा यांच्या वादात या पाडय़ावर पिढय़ान्पिढय़ा राहणारा आदिवासी समाज उपेक्षित राहिल्याचे चित्र पाहायला मिळते.
ठाणे शहरापासून म्हणजेच येऊरच्या पायथ्यापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर हे दोन्ही पाडे आहेत. जांभुळ पाडय़ाची लोकसंख्या जेमतेम दोनशे तर वाणी पाडय़ाची लोकसंख्या दोनशे ते अडीचशेच्या घरात आहे. येऊर पाटण पाडय़ापर्यंत टीएमटीची बससेवा आहे. तिथून पुढे जांभुळ व वाणी या दोन पाडय़ांमध्ये जाण्यासाठी एक ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. या पाडय़ांमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे तेथील राहिवाशांना दळणवळणसाठी डोंगर दऱ्यांमधील पायवाटांचा आधार घ्यावा लागतो. त्यापैकी अनेक ठिकाणी जागेला कुंपणाला बांधकाम करण्यात आल्याने आता या पाडय़ांकडे जाणाऱ्या अनेक पायवाटा बंद झाल्या आहेत तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलातील रानभाज्या विकून अनेकजण कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचे, पण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वन विभागाने बंदी घातल्यामुळे त्यांचा हा व्यवसाय बंद झाला आहे. त्यामुळे अनेकजण आता शहरात येऊन मोलमजुरीचे काम करतात. त्यातून त्यांना पाच ते सहा हजार रुपये मिळतात. या कामासाठी अनेक जण डोंगरतील पायवाटेने ठाणे शहरातील पवारनगर परिसरात येतात. येऊर परिसरात दोन शाळा आहेत. त्यापैकी एक दहावीपर्यंत तर दुसरी सातवीपर्यंत आहे. या शाळेत शिकणाऱ्या पाडय़ातील मुलांना शाळेत जाण्यासाठी दररोज दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
असुविधांचे ठाणे
जांभुळ पाडय़ातील बहुतेक घरे कुडाची आहेत. कुडाच्या भिंतींवर मातीचा लेप देण्यात आला आहे. या पाडय़ाच्या परिसरात जांभुळाची झाडे खूप आहेत. त्यामुळेच या पाडय़ाला जांभुळपाडा असे नाव पडले, असे तिथले गावकरी सांगतात. जांभुळ पाडय़ाच्या तुलनेत वणीच्या पाडय़ावर विटांची घरे आहेत. हे दोन्ही पाडे दहा मिनिटांच्या अंतरावर असून दोन्ही ठिकाणी एकही दुकान नाही. खाद्य पदार्थाच्या वस्तू आणायच्या असतील तर तेथील रहिवाशांना पाटणपाडा किंवा येऊर गावात जावे लागते. विशेष म्हणजे या दोन्ही पाडय़ांमध्ये आरोग्याची समस्या मोठी आहे. एखाद्या आजारी व्यक्तीची प्रकृती बिघडली तर त्याला चादरीची झोळी करून त्यातून दवाखान्यात उपचारासाठी शहरात न्यावे लागते. पाटण पाडय़ामध्ये टीएमटीची शेवटची बस रात्री ११. ३० वाजताची आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या वेळी एखाद्या रुग्णाला शहरात न्यायचे असेल तर त्यांना शहरापर्यंत पायी प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या सर्व परिस्थितीमुळे दोन्ही पाडय़ांतील भयावह वास्तव पाहावयास मिळते. असे असले तरी अनेक रहिवाशी आकडा टाकून वीज वापरताना दिसतात.
वीज, पाणी, रस्त्यांचा अभाव
येऊरमधील जांभुळ व वणी हे दोन्ही पाडे वीज, पाणी आणि रस्ते अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. वनविभाग आणि अन्य शासकीय यंत्रणा यांच्या वादामुळे या पाडय़ांपर्यंत अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही. वन विभाग नाहरकत पत्र देत नसल्यामुळे विद्युत विभागही त्यांना वीजपुरवठा करण्यास तयार नाही. या वादामुळे दोन्ही पाडे अद्याप अंधारात आहेत. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे असताना त्यांनी १९८८ मध्ये वीजपुरवठा दिला होता. पाडय़ातील रहिवासी त्यांच्या संपर्कात होते. कितीही व्यस्त असले तरी ते आम्हाला पाहिले की ते हातचे काम बाजूला ठेवून आमची समस्या जाणून घेत. ख्याली खुशाली विचारीत असल्याची आठवण एकाने सांगितली. अनेकदा त्यांनी पाडय़ांना भेटही दिली होती. साहजिकच येथील समस्यांची त्यांना जाण होती. त्यांच्या निधनानंतर २००४ मध्ये विद्युत विभागाने पाडय़ातील वीज जोडण्या तोडल्या. तेव्हापासून आतापर्यंत पाडे अंधारात आहेत. या पाडय़ातील राहिवासी महापालिकेचा मालमत्ता कर भरतात. तरीही हे पाडे सुविधेपासून वंचित आहेत, असे जांभुळपाडय़ातील रहिवाशी बबन चव्हाण यांनी सांगितले. या भागात शौचालयाची व्यवस्था नसल्यामुळे उघडय़ावर जावे लागते. तसेच सायंकाळी सातनंतर या पाडय़ांच्या परिसरात बिबटे येतात. त्यामुळे रात्री त्यांना घराबाहेर पडता येत नाही. बिबटय़ांची जबरदस्त दहशत येथील रहिवाशांमध्ये आहे. या दोन्ही पाडय़ांवर पाण्यासाठी टाक्या बसविण्यात आल्या आहेत, पण त्यातही पुरेसे पाणी नाही. चार ते पाच दिवस पाणी येत नाही. त्यामुळे राहिवशांनी पाण्यासाठी खड्डे खणले असून त्यातून कपडे तसेच अन्य कामासाठी पाणी वापरतात, असेही त्यांनी सांगितले. पाडय़ावर सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून अनेकदा शासन तसेच प्रशासनाच्या दारी निवेदने दिली, पण त्याचा काहीएक उपयोग झाला नसल्याचे अनिल गुरव यांनी सांगितले. मतदानाच्या वेळी उमेदवार पाडय़ावर येतात, पण निवडून आल्यावर कुणीच लक्ष देत नाही, असे बेबी वलवी यांनी सांगितले.