ठाण्यामध्ये एका तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. रिक्षाचालकाने कानात घातलेल्या ‘इयर फोन’मुळे त्याला प्रवासी तरुणीचा आवाज ऐकू न आल्याने घाबरलेल्या तरुणीने रिक्षातून उडी मारल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी दोन मैत्रिणी कासारवडवली येथून रिक्षात बसल्या. भाईंदरपाडा येथे एका मैत्रिणीला रिक्षातून उतरायचे होते, त्यासाठी त्यांनी रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले. पण त्यांचा आवाज न ऐकता त्याने भरधाव वेगाने रिक्षा पळवणे सुरूच ठेवले. इच्छित स्थळी न उतरविल्याने दोघी मैत्रिणी प्रचंड घाबरल्या. त्यामुळे दोघींपैकी एकीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिच्या हाताला आणि चेहऱ्याला मार लागला आहे. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी रिक्षाचालक कामरान खान (22 रा.दहिसर) याला अटक केली असून रिक्षाचालकाने त्यावेळी कानात इअरफोन घातल्यामुळे त्याला तरुणीचा आवाज ऐकू न आल्याचं सांगितलं जात आहे.