ठाण्यातील तरुणांनी विकसित केलेले अ‍ॅप पालिकेशी जोडणार

ठाणेकरांना पाणी बचतीचे महत्त्व कळावे तसेच जनजागृती व्हावी यासाठी स्वप्निल दाभाडे आणि मयूर दाभाडे या तरुणांनी जलमित्र नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप ठाणे महानगरपालिकेसोबत जोडले जाणार आहे. शहरात होणारी पाणीगळती कमी व्हावी यासाठी या अ‍ॅपच्या माध्यमातून थेट तक्रारी करण्याची संधी ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे.

ठाण्यात मोठय़ा प्रमाणात पाणीगळतीच्या तक्रारी पुढे येत असतात. पुरेसे मनुष्यबळ आणि यासंबंधीच्या तक्रारी वेळेत पोहोचत नसल्याने अनेकदा महापालिकेला योग्य पावले उचलता येत नाहीत. तसेच पाणीगळती दिसत असली तरी यासंबंधीची तक्रार नमकी कुठे करायची, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे असतो. हे लक्षात घेऊन टिटवाळ्यातील स्वप्निल दाभाडे आणि मयूर दाभाडे या तरुणांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत ‘जलमित्र’ नावाचे अ‍ॅप सुरू केले आहे. ज्या ठिकाणी पाणीगळती होत असेल किंवा पाण्याचा अपव्यय होत असेल त्या ठिकाणाचे छायाचित्र या अ‍ॅपद्वारे ठाणे महानगरपालिकेच्या ई-मेलवर जाईल, अशी व्यवस्था या तरुणांनी तयार केली आहे. त्यामुळे पाणीगळतीसंबंधी महापालिकेला तक्रारी वेळेत मिळतील शिवाय दुरुस्तीचे कामही वेगाने होऊ शकेल, असा दावा केला जात आहे. या अ‍ॅपमध्ये जलसंधारणाची माहितीदेखील असणार आहे. बुधवारी, जागतिक जल दिनी, या अ‍ॅपचे उद्घाटन ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

अ‍ॅप असे..

*वापरकर्त्यांना हे चार एमबीचे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल.

* पाणी गळती, नासाडी अथवा पाणीचोरी होत असल्याचे आढळताच अ‍ॅपवरील मोठे बटण दाबताच त्या ठिकाणचे छायाचित्र टिपले जाईल.

* छायाचित्राच्या खालील जागेत तक्रारदारांनी नाव, पत्ता आणि ठिकाण हे तपशील भरल्यानंतर हे छायाचित्र ठाणे महापालिकेच्या ईमेलवर पाठवले जाईल.

* नाव व पत्ता गुप्त ठेवूनही तक्रारदार ही तक्रार नोंदवू शकतील.

ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. गेल्या १७ वर्षांत राज्यातील २३ टक्के नद्या आटल्या आहेत. पाण्याचे हे दुर्भिक्ष्य शहरांतही जाणवू लागले आहे. त्यामुळे पाणीबचत करणे अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळेच आम्ही हे अ‍ॅप विकसित केले आहे.

स्वप्निल दाभाडे