24 April 2019

News Flash

प्रवास ‘शेअर’ करण्यासाठी ‘येताव’ अ‍ॅप ठाण्यातील तरुणांची अभिनव संकल्पना

अ‍ॅपच्या माध्यमातून इप्सित स्थळी पोहोचण्यासाठी खासगी वाहनांची मदत घेण्याची संधी ठाणेकरांना लाभली आहे.

आनंद वामनसे, रुपेश चौधरी आणि सुबोध अनंत मेस्त्री या तरुणांना स्वानुभवातून ‘येताव’ची संकल्पना सुचली.

आतापर्यंत तीन हजार नागरिकांची नोंदणी

ऋषिकेश मुळे, ठाणे

वाढत्या इंधनदरांमुळे स्वत:चे वाहन घेऊन फिरण्यावर आलेल्या मर्यादा आणि रिक्षा-टॅक्सी यासारख्या वाहतूक साधनांचे महाग भाडेदर अशा परिस्थितीत ‘शेअरिंग’ अर्थात प्रवासाचे भाडे विभागून देण्याचा पर्याय शहरांमध्ये चांगलाच रुळला आहे. मात्र आतापर्यंत रिक्षा, टॅक्सी किंवा अ‍ॅप आधारित वाहनांपुरता मर्यादित असलेला हा पर्याय आता थेट खासगी वाहनांकरिताही उपलब्ध झाला आहे. ठाण्यातील तीन तरुणांनी बनवलेल्या ‘येताव’ या अ‍ॅपच्या माध्यमातून इप्सित स्थळी पोहोचण्यासाठी खासगी वाहनांची मदत घेण्याची संधी ठाणेकरांना लाभली आहे.

ठाणे शहरातील रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून प्रत्येक नागरिकाची या कोंडीतून सुटका व्हावी आणि पर्यावरणपूरक वाहनांचा प्रवास व्हावा या दृष्टिकोनातून बनवण्यात आलेल्या या अ‍ॅपवर आतापर्यंत तीन हजार ठाणेकरांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे, या अ‍ॅपवर महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केवळ महिला असलेल्या वाहनांची माहिती देण्याची व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आनंद वामनसे, रुपेश चौधरी आणि सुबोध अनंत मेस्त्री या तरुणांना स्वानुभवातून ‘येताव’ची संकल्पना सुचली. आनंद वामनसे हा लंडन येथील नोकरी सोडून नुकताच भारतात आला होता. ठाण्यात वास्तव्यास असल्यापासून त्याची सनदी लेखापाल असलेल्या रुपेश चौधरी आणि तंत्रज्ञान शिक्षित सुबोध मेस्त्री या तिघांशी ओळख झाली. ठाण्यात नेहमीच्या वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवायला लागल्यानंतर ‘एकाच ठिकाणी जाणाऱ्या तीन प्रवाशांनी एकाच रिक्षातून प्रवास केला तर’ अशी संकल्पना त्यांच्या डोक्यात अवतरली. यातूनच ‘येताव’ या अ‍ॅपची बांधणी सुरू झाली. ठाणे स्थानकात सायंकाळी विविध भागात प्रवास करणाऱ्या रिक्षाच्या रांगेत सहज शंभर ते दोनशे नागरिक ताटकळत उभे असतात. त्यातले बरेच जण एकएकटे प्रवास करणारे असतात. पैसे आणि इंधन बचत या दोन उद्देशातून या अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केल्याचे सुबोध चौधरी याने सांगितले.

‘अ‍ॅप’ असे..

* हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर मोबाइल क्रमांक टाकून त्यात वापरकर्त्यांची नोंदणी करता येते.

* अ‍ॅपच्या पर्यायामध्ये सध्याचे ठिकाण नोंदवल्यानंतर ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या परिसराचे नाव नोंदवावे लागते.

* त्यानंतर अ‍ॅपमध्ये दुचाकी, रिक्षा, चारचाकी यातून हव्या त्या वाहनाची निवड करता येते.

* त्यानंतर त्या मार्गाने व त्या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची माहिती समोर येते. त्यापैकी अपेक्षित वाहन निवडून त्या वाहनचालकाशी वापरकर्त्यांचा थेट समन्वय साधला जातो.

* या प्रवासासाठी वापरकर्त्यांला वाहनचालकाला ठरावीक पैसे द्यावे लागतील. यामध्ये दुचाकीसाठी १२ तर रिक्षासाठी १८ रुपये भाडेदर आहे.

* तुमच्याकडे वाहन असल्यास आणि तुम्ही इतरांशी प्रवास ‘शेअर’ करू इच्छित असल्यास अ‍ॅपमध्ये पर्याय उपलब्ध आहे.

* हे अ‍ॅप संपूर्ण भारतात प्रवास करण्यासाठी उपयुक्त असल्याचे ‘झ्ॉपअ‍ॅप सोल्यूशन’ या कंपनीकडून सांगण्यात आले.

सुरक्षेची खबरदारी

या अ‍ॅपवर वाहनचालक म्हणून नोंद करणाऱ्यांना प्रथम वाहनाची मूळ कागदपत्रे अ‍ॅपवर टाकावी लागतात. या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावरच या वाहनचालकास परवानगी देण्यात येते. अ‍ॅपवर स्वत:ची नोंदणी करण्यासाठी आधी तीन परिचितांची नावे नोंदवावी लागतात.

महिलांसाठी..

‘येताव’ अ‍ॅपमध्ये महिलांसाठी विशेष ‘फीमेल बडीज’ हा पर्याय उपलब्ध आहे. यामुळे फक्त महिलाच, महिला वाहनचालकांसोबत प्रवास करू शकतात. रात्रीच्या वेळेस एकटय़ाने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त अ‍ॅप असल्याचे अ‍ॅपनिर्मात्यांनी सांगितले.

‘येताव’ अ‍ॅप तयार करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी लागला. आतापर्यंत तीन हजार नागरिकांनी या अ‍ॅपवर नोंदणी केली आहे. कोणताही नागरिक कोणत्याही नागरिकासोबत प्रवास करू शकतो. 

– रुपेश चौधरी

First Published on November 8, 2018 3:14 am

Web Title: thane youth innovative concept create mobile app for private car share