|| ऋषिकेश मुळे

आर्थिक मंदीमुळे गतवर्षीच्या तुलनेत ग्राहकांत २० टक्क्यांची घट :- आर्थिक मंदीचा फटका विविध उद्योग आणि व्यवसायांना बसला असतानाच, आता ठाणे जिल्ह्य़ातील वाहन विक्रीच्या व्यवसायावरही परिणाम झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी १ लाख २८ हजार ८५ वाहनांची नोंदणी झाली होती. तर यंदा ९७ हजार ४१२ वाहनांची नोंदणी झाली आहे. यामुळे यंदा वाहन विक्रीत २० टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे. वाढती महागाई, आर्थिक मंदी यामुळे वाहन खरेदी घटल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील सूत्रांनी दिली.

वाहन उद्योगावर आलेल्या मंदीच्या मळभाचा परिणाम हा त्यावरील इतर पूरक उद्योगांवरही झाला आहे. त्यामुळे एकीकडे कंपन्यांनी उत्पादन कमी केले असताना  वाहनखरेदीलाही ओढ लागली आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन खरेदीची नोंदणी केली जाते. या नोंदणीच्या आकडेवारीतून जिल्ह्य़ात वाहन विक्रीत २० टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी १ लाख २८ हजार ८५ वाहनांची नोंद झाली होती. तर यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत ९७ हजार वाहनांची नोंद झाली आहे. अनेक जण सणासुदीचा मुहूर्त साधून वाहन खरेदी करतात. मात्र, आता कोणताच मुहूर्त नसल्याने यंदाच्या आकडेवारीत फारशी वाढ होणार नसल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

बाजारपेठेतील बदलणाऱ्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम हा वाहन विक्रीवर झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ठाणे नोंदणीकृत वाहनांची संख्या २० टक्क्यांनी घटली आहे. – नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे