सप्टेंबर महिन्याच्या १५ तारखेला ठाणेकर रसिकांच्या भाग्यात ‘गुलजार’योग होता. अतिशय तरल मनाच्या या कवीने खास मुलांसाठी लिहिलेली बोस्की मालिका ‘ग्रंथाली’ने अतिशय देखण्या स्वरूपात मराठीत आणली आहे. त्याच्या प्रकाशनानिमित्त कविवर्य खास मुलांशी संवाद साधण्यासाठी ठाण्यात आले होते. कार्यक्रम खास मुलांसाठी असला तरी प्रेक्षागृहात सर्व वयोगटातील रसिक होते. आपल्या धीरगंभीर आवाजात अतिशय तरल रचना सादर करून गुलजारजींनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. मात्र ज्यांच्यासाठी गुलजारजी खास ठाण्यात आले होते, ती मुले मात्र बाल्कनीत, त्यांच्यापेक्षा काही अंतरावर होती. गुलजारांच्या ते लक्षात आले. त्यामुळे औपचारिक कार्यक्रम संपल्यावर अनौपचारिकपणे सर्व मुलांशी संवाद साधण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ‘मुझे कुछ जल्दी नही है, लाईन लगोओ, मै हरेक बच्चे को साईन दुंगा’ त्यांनी संयोजकांना तसे कळवलेही. मात्र दरम्यानच्या काळात विंगेत त्यांना एका अरसिक वृत्तीच्या ठाणेकराने गाठले. व्यासपीठावर राहून गेलेल्या सत्कारांची सव्याज भरपाई त्याने तिथे केली. भलामोठा पुष्पगुच्छ त्यांच्या हाती सोपविण्यात आला. त्यांच्या गळ्याभोवती शाली गुंडाळण्यात आल्या. त्यांच्यासह छायाचित्रे काढून घेतली गेली. शहराच्या अव्वल नागरिकाच्या या अतिउत्साही सत्काराने गुलजारजी अक्षरश: गुदमरले. क्षणापूर्वीचा त्यांचा ‘नूर आणि मूड’ पालटला. कितीही वेळ झाला तरी थांबण्याची तयारी असलेले गुलजार लगेच निघून गेले आणि ठाणेकर मुलांच्या भाग्यात अक्षरश: चालून आलेली ती गुलजार संध्या त्या अरसिक प्रवृत्तींमुळे वाया गेली.
– बातमीदार