21 February 2019

News Flash

स्वयंचलित यंत्रणेद्वारे काळजी घेणारी ‘स्मार्ट इमारत’

इलेक्ट्रॉनिक्सच्या मदतीने ‘स्मार्ट इमारत’ ही संकल्पना साकारण्याचा निर्णय त्याने घेतला.

ब्राझीलमधील लिब्राटो संस्थेच्या टेक फेस्टमध्ये सोहमची यंत्रणा मांडण्यात आली होती. दुसऱ्या छायाचित्रात सोहम.

आंतरराष्ट्रीय ‘टेक फेस्ट’मध्ये ठाणेकर सोहमच्या प्रकल्पाचा गौरव
घराबाहेर असताना घरातील पाण्याचा नळ उघडा राहिला तर..विजेची बटने सुरू राहिली तर..किंवा घरामध्ये चोर शिरला तर? घराबाहेर पडलेल्या प्रत्येकालाच घराबद्दलच्या काळजीने घेरलेले असते. मात्र या सगळ्या काळजीतून मुक्त करणारी स्मार्ट इमारत भविष्यात तयार होऊ शकते. स्वयंचलित पद्धतीने इमारतीमधील पाण्याचे नियोजन करण्याबरोबरच बाहेरील प्रकाशाप्रमाणे घरातील प्रकाशाचा समतोल साधण्याबरोबर घरातील शिरलेल्या चोराची सूचना देऊ शकेल अशी यंत्रणा ठाणेकर सोहम कुलकर्णी या तरुणाने विकसित केली आहे. विशेष म्हणजे ब्राझीलमधील नोव्हा हॅम्बरगो शहरात भरलेल्या लिब्राटो संस्थेच्या टेक फेस्टमध्ये या प्रकल्पाने तृतीय क्रमांक पटकावत ठाण्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावले.
ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्सच्या तृतीय वर्षांत शिकणाऱ्या सोहमला इलेक्ट्रॉनिक्स विषयामध्ये विशेष रुची आहे. मागील काही वर्षांपासून होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या टेकफेस्टमध्ये सोहम भाग घेत होता. त्यामुळेच विद्या प्रसारक मंडळाला ब्राझील येथील लिब्राटो संस्थेच्या टेकफेस्टचे निमंत्रण आल्यानंतर प्राचार्य डी. के. नायर यांनी सोहमकडे या फेस्टमध्ये सहभागी होण्याची जबाबदारी सोपवली. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी याची कल्पना मिळाल्यानंतर कमी कालावधीमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी सोहमवर होती. सोहमच्या कुटुंबाचा व्यवसायही इलेक्ट्रॉनिक्स विषयाशी संबधित असल्याने घरच्यांकडून त्याला विशेष मार्गदर्शन मिळाले.
इलेक्ट्रॉनिक्सच्या मदतीने ‘स्मार्ट इमारत’ ही संकल्पना साकारण्याचा निर्णय त्याने घेतला. या फेस्टसाठी विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. विजय बेडेकर आणि प्रा. सुधाकर आगरकर यांचे सोहमला या टेकफेस्टसाठी मार्गदर्शन मिळाले. गेल्या महिन्यामध्ये पाच दिवस चाललेल्या या फेस्टसाठी जगातील विविध देशांतून सुमारे ७५० प्रकल्प दाखल झाले होते. त्यामधील तिसरा क्रमांक सोहमच्या ‘स्मार्ट इमारत’ प्रकल्पाने पटकावला.

स्मार्ट इमारत प्रकल्पाविषयी..
सोहम याचा स्मार्ट इमारत प्रकल्प हा पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावर आधारित होता. वेगवेगळी साधने, उपकरणे आणि सेन्सरच्या साह्य़ाने इमारतीमधील पाणी, आर्द्रता, प्रकाश आणि वीजपुरवठा याचे मूल्यमापन करण्याची व्यवस्था तयार करण्यात आली होती. त्यामुळे घरातील टाकीचे पाणी भरून झाल्यानंतर बगीचाला पाणी पोहोचवणे, तेथे मुबलक पाणी मिळाल्यानंतर पाणी बंद होण्याची व्यवस्था यात आहे. शिवाय घरातील प्रकाशाची गरज लक्षात घेऊन त्यानुसार प्रकाश उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या प्रकल्पामध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबातील व्यक्तींशिवाय अन्य व्यक्तीने प्रवेश केल्यास तेही ओळखणारे सेन्सर या इमारतीमध्ये बसवण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने एका मोबाइल किंवा संकेतस्थळावरून या इमारतीच्या प्रत्येक भागाचे नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था या प्रकल्पात करण्यात आली होती. त्यामुळेच इतरांपेक्षा हा प्रकल्प लक्षवेधी ठरू शकला, असे मत सोहम कुलकर्णी याने व्यक्त केले.

 

First Published on December 4, 2015 12:56 am

Web Title: thanekara enjoying soham project glory of taking care of the automated system smart building