प्रशांत मोरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पालिका क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनासाठी श्रीमलंग परिसरात १२० एकर जमीन

मुंबई पालिका क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनासाठी अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग परिसरातील १२० एकर गुरचरण जागा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. परंतु  मलंगगड डोंगरावर उगम पावणाऱ्या कुशिवली, गवर आणि मुकी या तीन नद्या नामशेष होतील, अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.

बारमाही वाहत्या नद्यांच्या पाण्यावर स्थानिक ग्रामस्थ शेती आणि भाजीपाला करतात. तसेच याच प्रवाहात मासेमारीही करतात. सध्या या जागेतील करवले गावातील बाधितांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न शासकीय स्तरावर सुरू आहे. मात्र श्रमजीवी संघटनेने त्याला तीव्र विरोध केला आहे. कुटुंब स्थलांतरित कराल, पण बारमाही वाहत्या असणाऱ्या नद्यांचे कसे पुनर्वसन करणार, असा सवाल पर्यावरणप्रेमी उपस्थित करीत आहेत.

याच भागात कुशिवली धरण उभारण्याचा प्रस्ताव आहे. कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यातील पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी हे धरण उपयुक्त ठरणार आहे. मुरबाड तालुक्यातील काळू आणि शहापूर तालुक्यातील शाई धरण प्रकल्प स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने अद्याप मार्गी लागू शकले नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्य़ातील पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी कुशिवली हे सध्या एकमेव आशास्थान आहे. मात्र मुंबईतील कचराभूमी प्रकल्पामुळे कुशिवली धरण प्रकल्प धोक्यात येणार आहे. बेशिस्त नागरीकरण आणि औद्योगिकीरणाने याच परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीला सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटाराची अवकळा प्राप्त झाली आहे.

जे वालधुनीच्या बाबतीत घडले, ते कुशिवली, मुकी आणि गवर या प्रवाहांचे होऊ न देण्याचा निर्धार स्थानिक रहिवाशांनी केला असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी सुधाकर झोरे यांनी दिली. शासकीय स्तरावर गेली दोन वर्षे करवले येथील जागा कचराभूमीसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र आम्ही सुरुवातीपासूनच याला विरोध केल्याचे श्रमजीवी संघटनेचे राजेश चन्ने यांनी सांगितले.

मलंग पट्टय़ात कुशिवली धरण प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची काही कामे पूर्णही झाली आहेत. मात्र याच भागात कचराभूमी प्रकल्प राबविण्याबाबत येत असल्याबद्दल आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.

– योगेश सोनावणे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thanes increased water supply threat
First published on: 26-09-2018 at 03:14 IST