आम्ही असे  घडलो! कल्पेश भोईर

भूतकाळातील स्मृती जिवंत ठेवण्याचे काम छायाचित्रकार करत असतात. गेल्या काही वर्षांपासून छायाचित्रण तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत गेले असून सध्या छायाचित्रणाची ही कला ‘सेल्फी’पर्यंत येऊन पोहोचली आहे. छायाचित्रणाची कला चांगल्या प्रकारे टिकवून राहावी यासाठी वसईतील छायाचित्रकार निशिकांत म्हात्रे गेल्या तीस वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्यांची कला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असून त्यांचा छायाचित्रीकरणाचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे.

सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या निशिकांत म्हात्रे यांनी आपल्या छायाचित्रणाची सुरुवात महाविद्यालयीन जीवनापासूनच केली. गोखले महाविद्यालयात असताना मुंबई विद्यापीठातर्फे आठवडाभराच्या छायाचित्रण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वाचली. त्याक्षणी गावाकडच्या शेतात जाऊन मनमोहक निसर्गसौंदर्य, विविध आकाराची प्रतिबिंबे याची आठवण झाली. त्यामुळे प्रशिक्षण कार्यशाळेतून काही तरी शिकायला मिळणार या हेतूने यात आपणही सहभागी व्हावे असे वाटले. मात्र मुलाखतीसाठी पहिला प्रश्न कॅमेरा आहे का, असा विचारला गेला. त्यावर नाही असे उत्तर दिले. परंतु विकत घेईन, असे सांगितल्यावर मला या कार्यशाळेत प्रवेश दिला. त्यासाठी मित्राचा आगफा आयसोली हा कॅमेरा उसना घेतला. या कॅमेराने मुंबईतील कोळी वस्तीतील दैनंदिन जीवनातील काही छायाचित्रे टिपून घेतली होती. ती छायाचित्रे क्लब हाऊसमध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनात प्रसिद्ध झाली आणि कौतुकही झाले. त्यानंतर काही दिवसांनी मुंबईतील बजाज आर्ट कलादालनात ‘कॅमेरा क्लब ऑफ  इंडिया’चे पारितोषिक मिळालेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरणार असल्याची जाहिरात पाहून या कलादालनाला भेट दिली. यामध्ये लावण्यात आलेली विविध प्रकारची छायाचित्रे बारकाईने पाहून छायचित्रणात ‘कलात्मक छायाचित्रण’ (पिक्टोरिअल फोटोग्राफी) हा प्रकार असतो हे त्यांच्या लक्षात आले आणि यावरच आपण चांगले काम करायचे, असे त्यांनी ठरविले आणि पिक्टोरिअल फोटोग्राफी संदर्भात काम करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये असलेले बारकावे समजून घेतल्यानंतर कलात्मक छायाचित्रण करण्यासाठीचा दृष्टिकोन व चित्रातून कोणता संदेश पोहचवायचा आहे याची माहिती आणि त्याबाबतच्या तांत्रिक बाजूही शिकून घेतल्या. ३० वर्षांपूर्वी नायगाव पूर्वेतील जूचंद्र परिसरात ‘कॅमेरा क्लब ऑफ इंडिया’चे छायाचित्रकार छायाचित्रणासाठी येत होते. त्यांच्या सोबत सहभागी होण्याचीही संधी मिळाली आणि विविध ठिकाणच्या छायाचित्र सफरीही पूर्ण केल्या. त्यावेळी क्लबचे सर्वेसर्वा  छायाचित्रकार श्याम मचनेकर आणि विश्वास मौर्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. मचनेकर यांनी कलात्मक छायाचित्रण कसे करायचे याची नजर दिली, तर मौर्य यांनी खुल्या सूर्यप्रकाशात नेमका प्रकाश टिपण्याचे तंत्र दिले. त्यातून जेवढे जमेल तसं शिकून कलात्मक छायाचित्रणाला सुरुवात केली. काढलेली छायाचित्रे अधिकच चांगल्या प्रकारे टिपता येऊ  लागल्याने ती हळूहळू स्वीकारली जाऊ  लागली. त्यामुळे आपण करीत असलेले काम योग्य असल्याचा आत्मविश्वास मिळत गेल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

छायाचित्रणात अधिक कल्पकबुद्धीने विचार करून     छायाचित्रण करण्यासाठी विविध ठिकाणी सफरी सुरू झाल्या. राज्यस्थानसह विविध ठिकाणी जाऊन छायाचित्र टिपण्याचे काम सुरू केले. टिपलेली छायाचित्रे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी कशी जातील या अनुषंगाने अधिक मेहनत करून छायाचित्रण संदर्भातील विविध प्रकारची पुस्तके अभ्यासली. कॅमेऱ्याच्या विविध अँगलने छायाचित्रण कसे करायचे याचेही तंत्र चांगलेच अवगत झाले. परंतु सुरुवातीच्या काळात विविध ठिकाणी होणाऱ्या स्पर्धाची माहिती मिळविणेही दुरापास्त होते. नंतर हळूहळू इंटरनेट आले आणि गूगलवरून ऑनलाइन माहिती मिळविणे शक्य झाले. ही माहिती मिळविण्यासाठी संगणकाचे प्रशिक्षण घेतले. दादर येथील प्रताप परळकर यांच्याकडून फोटोशॉपचेही शिक्षण घेतले. २०१४मध्ये कॅनॉन कंपनीचा पहिला एट्री गेट कॅमेरा घेतला. १९९५ ते  सन २०१४ हा काळ छायाचित्रणातील म्हात्रे यांच्यासाठी संक्रमनाचा काळ ठरला.

त्यानंतर विविध ठिकाणी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन विविध प्रकारची पारितोषिकेही मिळविली आहेत. यामध्ये विशेष म्हणजे जुलै २०१५ मध्ये जपान इंटरनॅशनल फोटोग्राफ्रिक फेडरेशन यांच्यातर्फे  घेण्यात आलेल्या मोनोक्रोम विभागात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले सुवर्णपदक मिळाले आणि खऱ्या अर्थाने इतक्या वर्षांत केलेल्या मेहनतीचे सोने झाले होते. आत्मविश्वास प्रबळ होत गेल्याने जगभरात होणाऱ्या स्पर्धा, छायाचित्रकार व त्यांची छायाचित्रे, छायाचित्रकारांच्या शिखर संस्था अशा गोष्टी अभ्यासल्या आणि आतापर्यंत ३० देशातील स्पर्धेत सहभागी होऊन ३५ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पारितोषिके व ४५० हून अधिक इतर पारितोषिके मिळविली आहेत. यामध्ये दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फोटोग्राफिक आर्ट बेल्जियम या संस्थेकडून मानाचा पुरस्कार मिळाला आहे, तर भारतातील दि फेडरेशन ऑफ इंडियन फोटोग्राफीचा ‘फेला एफ आय पी’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या तीस वर्षांच्या छायाचित्रण क्षेत्रातील जुना आणि आताचा असे दोन्ही काळ अनुभवायला मिळाले, याचे नक्कीच खूप समाधान असून आता येणाऱ्या वर्षांतही ही वाटचाल अशीच सुरू ठेवून निसर्ग व वन्यप्राणी यांचेही छायाचित्रण सुरू  ठेवणार असल्याचे छायाचित्रकार निशिकांत म्हात्रे यांनी सांगितले. एक छायाचित्रकार म्हणून रंगसंगतीची उत्तम जाण, नवनिर्मितीची क्षमता, कलात्मक भान, दृश्यमांडणीची कल्पकता, निरीक्षण शक्ती, आत्मविश्वास या कलाकौशल्याच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले आहे.