लोणावळ्यातल्या मनशक्ती केंद्रातली अप्रतिम मिसळ खाऊन सागरसोबत वळवण डॅमच्या परिसरात पक्षी निरीक्षणासाठी फिरत होतो. काही अंतरावरून मुंगूस धावत गेला. ‘मुंगूस बघितला का?’ आमच्या एका उत्साही कार्यकर्त्यांने विचारलं. सागर हसायला लागला, सागर चंदने हा पक्षितज्ज्ञ. त्यात लोणावळ्यातच राहणारा, त्यामुळे हे जंगल त्याच्या पायाखालचं.
‘काय झालं हसतोय का?’
‘अरे मुंगूस नाही, पक्षी आहे तो. कोकिळेचा जातीतला.’ एकमेकांत कुजबुजत आम्ही एक झाडाच्या आडोशाला थांबलो. लाल चोचीचा कोकिळेच्या आकाराचा करडय़ा तपकिरी रंगाचा पक्षी पुन्हा झुडुपातून बाहेर आला. झाडाझुडपातून जमिनीवरून धावताना जर का या पक्ष्याला पाहिलं तर मुंगुसाचा भास होतो. म्हणूनच याला मुंगश्या म्हणतात. हुकासारखी चोच, लांब शेपटी, टोकाला पांढरा चट्टा या सर्व गोष्टींनी हा पक्षी कोकिळेच्या जातकुळातला आहे, असे जाणवतं.जरी हा कोकिळेचा जातभाई असला तरी तसा हा सावत्रच असावा किंवा दूर कोणाकडे तरी सांभाळायला दिलेल्या मुलासारखा, कारण याचा स्वभाव इतर कोकीळ कुळातील पक्ष्यांपेक्षा फार वेगळा आहे. मुळात कोकीळ कुळातील इतर पक्ष्यांप्रमाणे आळशी नाही. स्वत:चे घरटे स्वत: करतो आणि पिल्लांचे संगोपनही स्वत:च करतो. कोकिळेप्रमाणे पूर्णवेळ झाडावर नसतो तर बऱ्याचदा जमिनीवर फिरतो.किडे, पाली शोधत काटय़ाकुटय़ांतून फिरताना लपून राहाण्यासाठी याच्या मातकट रंगाचा याला फायदा होतो. कोकिळेप्रमाणे हा काही चांगला गातही नाही. ‘बझूक – बझूक’ असा साधारणसा आवाज हा काढतो. मात्र कुठलेही संकट दिसताच पटँग – पटँग असा भांडी आपटल्यासारखा आवाजही हा काढतो. पावसाळ्यात बांबूच्या बनात अथवा तशाच गर्द झुडुपात साधारण ६-७ फुटांवर सिरकीर माल्कोहा घरटे बनवतो. मादी २-३ अंडी घालते, पिलाचे संगोपन नर मादी दोघे मिळून करतात. मुख्यत्वेकरून किडे-पाली-फळे खाणारे हे पक्षी छोटे उंदीर किंवा इतर छोटय़ा पक्ष्यांची शिकार करतांनाही कधी कधी दिसतात. शास्त्रीय भाषेत याला फानीएकोफेयूस लेशेनॉल्टी असे म्हणतात. यातील फानीएकोफेयूस हा शब्द फोनीइको म्हणजे लाल रंग आणि फाएस म्हणजे तोंड या दोन प्राचीन ग्रीक शब्दांवरून आला आहे. तर लेशेनॉल्टी हे नाव एका फ्रेंच पक्षिशास्त्रज्ञाच्या नावावरून आले आहे.इंग्रजीत याला सिरकीर माल्कोहा असे म्हणतात. यातील माल्कोहा हा शब्द श्रीलंकेतील सिंहली भाषेतील असून याचा अर्थ फुलांवरील कोकीळ असा आहे. ब्लू फेस माल्कोहा नावाचा याचा अजून एक जातभाई कोकण पट्टय़ात क्वचित दिसतो.