कळवा, मुंब्य्रातील महिला प्रवाशांची ठाणे स्थानकात कोंडी
फलाटावर आलेल्या रेल्वेगाडीत चढताना होणारी धक्काबुक्की आणि गोंधळ बंद करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील प्रथम दर्जाच्या महिला डब्यात चढण्यासाठी रांग लावण्याची शिस्त प्रवाशांनीच अमलात आणली आहे. यामुळे महिला डब्यात चढताना व उतरताना होणारा गोंधळ कमी झाला असला तरी, या स्वयंशिस्तीचा फटका ठाण्यातून कळवा, मुंब्रा अशा नजीकच्या स्थानकांत जाणाऱ्या महिला प्रवाशांना बसू लागला आहे. केवळ दहा-पंधरा मिनिटांच्या रेल्वे प्रवासासाठी या प्रवाशांना फलाटावरील रांगेतच अर्धा-पाऊण तास घालवावा लागत आहे.
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडय़ांना सायंकाळच्या सुमारास मोठी गर्दी असते. या वेळी महिलांच्या प्रथम दर्जाच्या डब्याजवळ होणारी चेंगराचेंगरी दूर करण्यासाठी काही महिलांनी गाडीत चढण्यासाठी रांग लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर अशी रांग लावण्यासाठी महिला प्रवाशांना सक्तीच केली जाऊ लागली. यावरून दररोज महिला प्रवाशांता खटके उडू लागले आहेत. घाईमध्ये असलेल्या महिला प्रवाशांनी याला विरोध करून गर्दीच्या भरून आलेल्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी रांगेची सक्ती का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. विशेष म्हणजे कळवा, आणि मुंब्रा परिसरात जाण्यासाठी फक्त १५ मिनिटांचा वेळ लागत असताना रांगांमुळे या महिलांना अर्धा ते एक तास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे अर्थातच प्रवाशांना रांगेचा जाच नको आहे. अखेर हा वाद स्थानक व्यवस्थापकांपर्यंत गेला. मात्र त्यांनी याप्रकरणी मध्यस्थी करण्यात अथवा तोडगा काढण्यात असमर्थता दर्शवली. त्यामुळे आता न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न महिला प्रवाशांना पडला आहे.
परदेशातील गाडय़ांमधील रांगा, मेट्रोसाठीच्या रांगा पाहिल्यानंतर लोकलमध्येही रांगाचा आग्रह धरण्यात येत असला तरी या रांगा गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये उपयुक्त ठरण्याची शक्यता नाही. ठाणे, कल्याण-डोंबिवलीतून सुटणाऱ्या गाडय़ांमध्ये रांगेचा प्रयोग यशस्वी होत आहे. मात्र गर्दीच्या काळात प्रवाशांमध्ये संताप निर्माण होण्याची शक्यता आहे. या उलट असे प्रयोग करण्यासाठी पुरेशा गाडय़ा सोडण्याची गरज असून त्यानंतर जागांची उपलब्धता लक्षात घेऊन असे प्रयोग करण्यास हरकत नाही.
– लता आरगडे, तेजस्विनी महिला प्रवासी संघटना
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 1:32 am