पावसाआधी नालेसफाई पूर्ण करण्याचे आव्हान
बेकायदा बांधकामे आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडलेल्या ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरांना कोंडीमुक्त करण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दोन महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. या रुंदीकरणाच्या कामासाठी रस्त्यालगतची हजारो बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या कारवाईनंतर सीमेंट काँक्रीट तसेच डांबरी रस्ते तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, पाऊस येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांची कामे पूर्ण होणार का, असा सवाल शहरातून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरांचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण झाले असून शहरातील वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी शहरातील अनेक रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. त्यामुळे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दोन महिन्यांपूर्वी रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत पोखरण रस्ता क्रमांक एक आणि दोन, तीन हात नाका, शास्त्रीनगर, हत्तिपूल, कळवा आणि मुंब्रा या भागातील बेकायदा बांधकामे रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पाडण्यात आली आहेत. या कारवाईनंतर महापालिकेने रस्ते तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. असे असले तरी सर्वच रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. तसेच पावसाळ्यात ही कामे करणे शक्य होणार नाही. येत्या १० जूनपर्यंत ही कामे पूर्ण केली जातील असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच तिन्ही शहरांतील रस्त्यांची कामे ७० ते ८० टक्के इतकी झाली असल्याचा दावाही करण्यात येत आहे, तर पोखरण रस्ता क्रमांक दोनचे काम उशिरा सुरू झाल्यामुळे ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य होणार नसल्याचा आहे.

नाल्यांची संख्या..
ठाणे महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत ११७ किलोमीटर अंतराचे एकूण ३०६ नाले आहेत. मुंब्य्रात ३१ किमीचे ९२ नाले आहेत, कळव्यात ९ किमीचे ४७, रायलादेवीमध्ये १७ किमीचे ३७, वर्तकनगर १९ किमीचे २५, मानपाडा १७ किमीचे २६, नौपाडा साडेचार किमीचे २४, वागळे ८ किमीचे २०, उथळसर साडेसात किमीचे २४ आणि कोपरीत ४ किमीचे ११ नाले आहेत.

नालेसफाई ६० टक्के
ठाणे महापालिका प्रशासनाने यंदा महिनाभर आधीच नालेसफाईची कामे हाती घेतली असून ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरातील नाल्यांची आतापर्यंत ६० टक्के सफाई झाली आहे. दर वर्षी नालेसफाईच्या कामास होणारा उशीर आणि सफाईनंतरही नाल्यात असलेला गाळ यामुळे महापालिका प्रशासनावर टीका व्हायची. या पाश्र्वभूमीवर नालेसफाईची कामे वेळेत आणि व्यवस्थित व्हावीत म्हणून महापालिका प्रशासनाने यंदा नालेसफाईसाठी अधिक ठेकेदार नेमले आहेत. प्रत्येक प्रभाग समित्यांमध्ये यापूर्वी एक ते दोन ठेकेदार असायचे, पण यंदा प्रत्येक प्रभाग समित्यांमध्ये चार ते पाच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत शहरातील नालेसफाईची कामे करण्यात येत असून या कामांच्या देखरेखीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

कामाचे चित्रीकरण..
पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे दोनदा केली जातात. मात्र अनेक ठेकेदार नाल्यातील गाळ काढत नाहीत आणि पावसाळ्यात पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. तसेच या कारणावरून महापालिकेच्या कारभारावर टीकेचे आसूड ओढले जातात. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन महापालिकेने गेल्या वर्षीपासून कामाचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे यंदाही या कामाचे चित्रीकरण करण्यात येत आहे. नालेसफाई करण्यापूर्वी आणि साफसफाईनंतरची परिस्थिती असे दोन्हींचे छायाचित्रण महापालिका करणार आहे.

रस्त्यांच्या कामांची पूर्णत्वाची टक्केवारी..
पोखरण रस्ता क्रमांक – ८० टक्के
तीन हात नाका १०० टक्के
मुख्य बाजारपेठ ८० टक्के
कळवा ८० टक्के
मुंब्रा ९० टक्के

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी निधीची तरतूद
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरातील रस्त्यांवर सध्या तरी खड्डे नाहीत. मात्र असे असले तरी, पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीला २५ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. याशिवाय, गेल्या वर्षी रस्त्याची कामे काढण्यात आली होती, मात्र या कामांची मुदत अद्याप संपलेली नाही आणि या कामाचा निधीही शिल्लक आहे. त्यामुळे यंदा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी मोठा निधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट होत आहे.