मोठय़ा प्रमाणातील कामांमुळे रस्त्याची गरज नसल्याचा रस्ते महामंडळाचा निष्कर्ष

कल्याण-डोंबिवली परिसरात ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या वतीने रस्ते, उड्डाणपुलांची मोठय़ा प्रमाणातील कामे पाहता कल्याण बावळण रस्त्याची आता गरज नसल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काढला आहे. त्यामुळे  १३ वर्षे जुना प्रस्ताव रद्द करण्यासाठी महामंडळाने तो शासनाकडे पाठवला आहे, अशी माहिती माहिती अधिकारांतर्गत मिळाली आहे.

कल्याण बावळण रस्ते कामासाठी शासनाने १०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. टप्पा क्रमांक एक अंतर्गत भिवंडी, कल्याण ते शिळफाटा रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण करण्याचे काम करण्यात आले. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर टप्पा दोनचे काम सुरू होणे आवश्यक होते. टप्पा एकमधील कामे समाधानकारक न झाल्याने शिळफाटा रस्त्यालगतच्या काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. टप्पा दोन लोकप्रतिनिधी, महामंडळ, पालिका अधिकाऱ्यांच्या विस्मरणातून गेला. आता शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी सुरू झाल्यामुळे टप्पा दोनची आठवण लोकप्रतिनिधींना येऊ लागली आहे.

स्थायी समिती सभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी या विषयावर स्वतंत्र सभा घेण्याचे आदेश सभापती राहुल दामले यांनी दिले.

टप्पा एक शिळफाटा रस्त्याचे पुनर्पृष्ठीकरण करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ला कल्याण डोंबिवली पालिकेची ‘ना हरकत’ हवी होती. हे हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी पालिकेने ‘एमएसआरडीसी’ला पुनर्पृष्ठीकरण कामाबरोबर गोविंदवाडी बावळण रस्त्याचे काम करून देण्याची अट घातली होती.

याशिवाय, दुर्गाडी ते काटई रस्त्याची देखभाल दुरुस्ती, शिळफाटा रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर टोलवसुलीसाठी महामंडळाला परवानगी देण्याचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला होता. ‘ना हरकत’ मिळाल्यानंतर महामंडळाने त्यांची प्रस्तावित कामे पूर्ण केली. टोलवसुली केली. टप्पा दोनमधील कल्याण बावळण रस्ता बांधून देण्याचा प्रयत्न महामंडळाकडून करण्यात आला नाही, अशी तक्रार श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे.

‘एनओसी’ रद्दची मागणी

‘एमएसआरडीसी’ने कल्याण पालिका हद्दीतील शिळफाटा रस्त्याची कामे पूर्ण केली. टोल वसूल केला. रस्ते देखभाल-दुरुस्तीची कामे प्राधान्याने केली नाहीत. शिळफाटा रस्ता सुस्थितीत झाल्यानंतर या रस्त्यावरून आता अवजड वाहतूक सुरू आहे. या वाहतुकीमुळे शिळफाटा रस्त्याबरोबर कल्याण, डोंबिवली परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे महामंडळाला दिलेली ना हरकत रद्द करून या रस्त्यावरील अवजड वाहतूक थांबवावी, अशी मागणीही पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे करण्यात आली आहे.

राजकीय आंधळेपणा

२००६ मध्ये टप्पा दोन मंजूर झाला, त्यावेळी राज्यात काँग्रेस आघाडी सरकार होते. कोन ते कचोरे, नंदी पॅलेस रस्ता बांधला तर आलेला निधी कामांसाठीच खर्च होईल. त्यामधून ‘हातसफाई’ करता येणार नाही, असे आडाखे बांधून नेहमीच ‘डाव’ पलटविण्यात माहीर असलेल्या एका नेत्याने टप्पा दोन नंतर बांधू असे ‘गणित’ बांधून शिळफाटा रस्त्याच्या पुनर्पृष्ठीकरणाचा घाट घातला. ही कंत्राटे मर्जीतील ठेकेदारांना दिला. आणि टप्पा दोनचे भिजत घोंगडे घालून ठेवले, अशीही सूत्रांकडून समजते.

माणकोली पूल, भिवंडी बाह्यवळण रस्त्यावरील पूल, पलावा येथे भुयारी मार्ग, शिळफाटा चौक येथे पूल, नाहूर ते काटई मार्ग असे रस्ते प्रस्तावित आहेत. वाहतुकीसाठी नवीन मार्ग येत्या काळात उपलब्ध होणार असल्यामुळे ‘एमएसआरडीसी’चा टप्पा दोनचा प्रस्ताव शासनाकडे फेरविचारार्थ पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही.

-एस. एल. बोंडे, अभियांत्रिकी विभाग ‘एमएसआरडीसी’