भाजपच्या विद्यमान आणि माजी महापौर गीता जैन आणि मीरा-भाईंदर भाजपची सूत्रे आपल्या हाती ठेवणारे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील वाद नुकताच जाहीरपणे चव्हाटय़ावर आला आहे. या निमित्ताने तत्कालीन नगरपरिषद आणि सध्याच्या महानगरपालिकेतील सर्वोच्च स्थानावर बसणाऱ्या व्यक्तींमध्ये निर्माण होणारी राजकीय महत्त्वाकांक्षा आणि त्यातून स्थानिक पातळीवरील बलिष्ठ नेत्यांशी निर्माण होणारे वितुष्ट पुन्हा चर्चेत आले आहे.

मीरा-भाईंदर नगरपरिषदतेली नगराध्यक्षपद आणि नंतर स्थापन झालेल्या महानगरपालिकेतील महापौरपद ही दोन्ही पदे राजकीयदृष्टय़ा अतिशय महत्त्वाची. या पदावर बसलेल्या व्यक्तींमध्ये (काही जणांचा अपवाद वगळता) जागृत झालेली राजकीय महत्त्वाकांक्षा आणि वर्चस्व गाजवण्याच्या अहमहमिकेमुळे इथले राजकारण कायमच घुसळून निघाले आहे. भाजपच्या नगरसेविका आणि माजी महापौर गीता जैन यांनी शहरभर लावलेल्या ‘धर्मस्थापनार्थ’ या फलकावरून त्यांचा आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील संघर्ष पुन्हा शहरवासीयांच्या चर्चेचा विषय बनला आहे. गीता जैन महापौर असल्यापासून त्यांच्यात आणि आमदार मेहता यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले होते, परंतु दोन महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींमध्ये सुरू असलेल्या राजकीय द्वंद्वाला २० वर्षांपासूनची राजकीय पार्श्वभूमी आहे आणि त्याचा परामार्श घेण्यासाठी थेट २० वर्षे मागे जावे लागेल.

तत्कालीन नगरपरिषदेत मीरा-भाईंदरच्या राजकारणातील एकेकाळचे बलिष्ठ नेतृत्व गिल्बर्ट मेन्डोन्सा हे नगराध्यक्ष होते, परंतु त्या वेळच्या एका प्रकरणात त्यांना सहा वर्षे निवडणूक बंदीला सामोरे जावे लागल्याने त्यांच्यावर नगराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. मेन्डोन्सा यांनी त्या वेळी राजकारणातील आणखी एक वजनदार नेते प्रफुल्ल पाटील यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. काही काळ दोघांमध्ये चांगले मेतकूट जमले होते. या काळातही मेन्डोन्सांनी राजकारणाची सूत्रे आपल्या हाती ठेवली होती, परंतु प्रफुल्ल पाटील हे पहिल्यापासूनच एक महत्त्वाकांक्षी नेते म्हणून ओळखले जात. त्यामुळे पुढे त्यांनी मेन्डोन्सांवर कुरघोडी करण्याचे पद्धतीशीर प्रयत्न सुरू केले आणि दोन्ही नेत्यांचे चांगलेच फिसकटले.

पुढे महापालिका स्थापन झाल्यानंतर दुसरे महापौरपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने शिक्षिका असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका निर्मला सावळे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. मात्र मेन्डोन्सा यांनी कारभाराची सूत्रे आपल्याच हाती ठेवली. महापौरपदी सावळे असल्या तरी मेन्डोन्सा महापौरांच्या अँटीचेंबरमध्ये बसून आपल्या पद्धतीने महापालिकेच्या कारभाराचा गाडा हाकत असत. अँटीचेंबरमध्ये बसून कोणती कामे चालतात यावर अधिक भाष्य न केलेलेच बरे. त्यामुळे सावळे आणि मेन्डोन्सा यांच्यात संघर्षांची ठिणगी पडायला वेळ लागला नाही.

त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्या वेळी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गिल्बर्ट मेन्डोन्सा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी मेहता यांना महापौरपदी बसवले. त्या वेळीही मेन्डोन्सा यांच्या कार्यपद्धतीत बदल झाला नाही. त्यांचे अँटीचेंबरमध्ये बसणे या वेळीही सुरू राहिले, परंतु मेहताही अतिशय महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांची महत्त्वाकांक्षा एक दिवस राजकारणात आपल्यालाच मात देणारी ठरेल याची मेन्डोन्सा यांना त्या वेळी थोडीदेखील कल्पना नसेल. मेहता यांची राजकारणातल्या प्रगतीची पाळेमुळे त्यांच्या महापौरपदातच रुजली गेली होती. त्यामुळे लवकरच मेहता आणि गिल्बर्ट मेन्डोन्सा यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य व्हायला वेळ लागला नाही. परिणामी त्यांनी मेन्डोन्सांनाच आव्हान द्यायला सुरुवात केली, त्यात यशस्वी ठरले आणि नगरसेवक ते आमदार व्हाया महापौर अशी त्यांनी राजकीय घोडदौड केली.

त्यानंतर महापौर झालेले तुळशीदास म्हात्रे फारसे महत्त्वाकांक्षी नव्हते आणि नंतरच्या महापौर कॅटलीन परेरा या गिल्बर्ट मेन्डोन्सा यांच्याच कन्या असल्याने या दोन्ही महापौरपदाचा कार्यकाल तसा शांततेत गेला.

त्यानंतर महापालिकेत सत्तापरिवर्तन झाले आणि भाजप-शिवसेना युतीची सत्ता महापालिकेत स्थापन झाली. भाजपची सर्व सूत्रे नरेंद्र मेहता यांच्या हाती होती. युतीच्या महापौर म्हणून भाजपच्या गीता जैन महापौरपदी विराजमान झाल्या. मेहता आणि जैन यांच्यातला दीड वर्षांचा काळ सुरळीतपणे गेला. मेहताही मेन्डोन्सांचा कित्ता गिरवत अँटीचेंबरमध्ये बसून प्रशासनाला आदेश देऊ लागले आणि इतिहासाची पुनरावृत्ती झाली. जैन आणि मेहता यांच्यात खटके उडू लागले. या संघर्षांने त्या काळात उघडपणे टोकाची भूमिका घेतली नसली तरी दोघांमध्ये सुप्त वाद होता.

आता हा संघर्ष उघडपणे सुरू झाला आहे. गीता जैन यांना घरातच राजकारणाचे धडे मिळाले आहेत. त्यांचे सासरे मिठालाल जैन हे एकेकाळच्या भाईंदरच्या राजकारणातले सर्वेसर्वा. सरपंच, जिल्हा परिषद सभापती आणि राजस्थानमधून खासदार अशी त्यांची रायकीय वाटचाल आहे. या पाश्र्वभूमीवर गीता जैन यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले नाही तरच नवल. त्यामुळेच त्यांनी मेहता यांना पक्षांतर्गत आव्हान द्यायला सुरुवात केली असून त्यांची नजर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आहे. आता हा संघर्ष कोणत्या पातळीवर जातो आणि त्यात कोण कोणाला मात देतो हे आता येणारा काळच ठरवणार आहे.