मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

डोंबिवली : गेल्या २७ महिन्यांपासून सुरू असलेल्या कोपर पुलाचे काम अखेर पूर्ण झाले असून या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. यामुळे डोंबिवलीकरांना आता वळसा घालून प्रवास करावा लागणार नसून त्याचबरोबर या भागातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची चिन्हे आहेत.

डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भाग जोडणारा कमी अंतराचा कोपर उड्डाण पूल हा एकमेव मार्ग आहे. हा पूल बंद झाल्याने वाहनचालकांना ठाकुर्ली उड्डाणपूल येथून वळसा घेऊन इच्छितस्थळी जावे लागत होते. यापूर्वी डोंबिवली पश्चिमेतील वाहने कोपर पुलावरून टंडन रस्ता-मानपाडा रस्तामार्गे आठ ते १० मिनिटांत कल्याण-शिळफाटा रस्त्याला जात होती. परंतु कोपर पूल बंद असल्यामुळे ठाकुर्ली पूलमार्गे वाहतूक सुरू होती. या मार्गे कल्याण-शिळफाटा रस्त्यावर जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होता. हा प्रवास करताना नागरिकांना अनेक वेळा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रहिवासी कोपर पूल कधी सुरू होतो याच्या प्रतीक्षेत होते.

ठाकुर्ली पूल अरुंद असल्याने अवजड वाहने तसेच केडीएमटीच्या बस या पुलावरून वळण घेऊ शकत नव्हत्या. कोपर पूल बंद झाल्याने नवी मुंबईकडे शास्त्रीनगर रुग्णालय बस थांब्यावरील बसचा थांबा डोंबिवली पूर्वेतील टंडन रस्ता येथे आणण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिमेतील नोकरदारांना रेल्वे जिन्यावरून पूर्व भागात येऊन मग प्रवास करावा लागत होता. डोंबिवलीत लहान मोठे घरगुती व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ठाकुर्ली पूलमार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत होता. कोपर पूल सुरू झाल्याने नोकरदार, लघु उद्योजक, व्यावसायिक, अवजड वाहनचालक, रिक्षाचालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

उद्घाटनाचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ िशदे, खासदार कपिल पाटील, खा. डॉ. श्रीकांत िशदे, आमदार रवींद्र चव्हाण, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत.

२१ तुळयांची रचना

  • २६ मे २०१९ रोजी कोपर पूल मध्य रेल्वेकडून धोकादायक जाहीर
  • १५ सप्टेंबर २०१९ रोजी पूल वाहतुकीसाठी पूर्ण बंद
  • पालिकेला ठेकेदार न मिळाल्याने रेल्वेच्या ठेकेदाराकडून पुलाचे काम सुरू
  • पुलाच्या कामासाठी १२ कोटी चार लाखांचा खर्च
  • मूळ खर्च नऊ कोटी ८१ लाख. वाढीव दोन कोटी १९ लाखाला ७ सप्टेंबर २०२०च्या सभेत मंजुरी
  • पुलाच्या उभारणीसाठी २१ तुळयांची रचना

इतर विकास प्रकल्पांचे उद्घाटन

कोपर उड्डाण पुलानंतर मुख्यमंत्री पालिका हद्दीतील इतर १० प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये तेजस्विनी बससेवा, ऑक्सिजन प्रकल्प, नागरी आरोग्य केंद्र, पालिका रुग्णालयांतील अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, टिटवाळा येथील अग्निशमन केंद्र, आंबिवलीतील जैवविविधता उद्यान, शहर दर्शन बससेवा या प्रकल्पांचा समावेश आहे.