रुग्ण दुपटीचा वेग नऊ दिवसांवर; सर्वाधिक रुग्ण २१ ते ४० वयोगटातील

किशोर कोकणे लोकसत्ता

ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात रविवापर्यंत एकूण ७१२ करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण दुपटीचा (डबलिंग रेट) वेग नऊ दिवस इतका झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील असून त्याचे प्रमाण हे एकूण आकडेवारीच्या ४५ टक्के आहे. सुदैवाने या वयोगटातील एकाही करोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती  सूत्रांनी दिली. महापालिका क्षेत्रात तपासणीचे प्रमाण वाढत असल्याने तसेच विलगीकरणात असलेले रुग्ण करोनाबाधित होत असल्याने आकडेवारीमध्ये वाढ होत असल्याची माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ठाणे जिल्ह्य़ात बाधितांचा आकडा २ हजारांहून अधिक झाला असून या बाधितांमध्ये सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या ही ठाणे पालिका क्षेत्रात आहे. ठाणे पालिका क्षेत्रात १२ मार्चला घोडबंदर भागात करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर, महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात होत्या. मात्र, १२ एप्रिलनंतर बाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत गेली. १२ एप्रिलपर्यंत ७९ इतक्याच रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मागील २८ दिवसांत ६३३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद आढळून आली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या आता ७१२ इतकी झाली आहे. ही सरासरी काढल्यास १२ एप्रिल ते १० मे या कालावधीत प्रत्येक दिवसाला २० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांमध्येही सर्वाधिक रुग्ण हे तरुण वयोगटातील आहेत. ठाण्यात २१ ते ३० वयोगटातील करोनाबाधितांची संख्याही १६३ इतकी आहे, तर ३१ ते ४० वयोगटातील करोनाबाधितांची संख्या ही १६५ इतकी आहे. त्यामुळे एकूण करोनाबाधितांच्या आकडेवारीपैकी ४५ टक्के करोनाबाधित हे तरुण वयोगटातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.  ठाण्यातील ७१२ रुग्णांपैकी ४५० रुग्ण हे पुरुष असून २६२ महिला आहेत. त्यामुळे महिलांचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र आहे.

वयोगटानुसार रुग्ण

वयोगट       बाधित

शून्य         १३

१ ते १०       २८

१० ते २०      ५६

२१ ते ३०      १६३

३१ ते ४०      १६५

४१ ते ५०      १३४

५१ ते ६०      ९१

६० पुढे       ६२

 

प्रभागनिहाय आकडेवारी

प्रभाग                                      रुग्ण

माजिवडा मानपाडा                    ३८

वर्तकनगर                                 ४७

लोकमान्य सावरकर नगर          १७०

नौपाडा-कोपरी                            ६५

उथळसर                                    ५६

वागळे                                       १२८

कळवा                                       ६४

मुंब्रा                                          १०३

दिवा                                         ४१

एकूण                                       ७१२