शहरातील वाघबीळ परिसरातील तलावाजवळ मृतावस्थेत आढळलेल्या १५ बगळय़ांनाही ‘बर्ड फ्लू’ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून शहरात मृतावस्थेत आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती कळवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्याच वेळी नागरिकांमध्ये अफवा वा गैरसमज पसरू नये, याकरिता हा कक्ष कार्यरत राहणार आहे.

ठाण्यातील घोडबंदरमधील वाघबीळ परिसरात काही दिवसांपूर्वी १५ बगळे मृतावस्थेत आढळले होते. या घटनेच्या दोन दिवसांनंतर याच परिसरात १ गिधाड मृतावस्थेत आढळून आले होते. या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्यानंतर या सर्व पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या साथीमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि मृत झालेल्या पक्ष्यांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास द्यावी, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.

ठाणे महापालिका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली हा नियंत्रण स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील टोल फ्री क्रमांक १८००२२२१०८ तसेच ०२२ २५३७१०१० या हेल्पलाइनवर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.