गणेशमूर्तीवर दरवर्षी चित्रपटांचा प्रभाव ठळकपणे दिसतो. कधी एखादी मूर्ती बाहुबलीच्या रूपात असते, तर कधी मल्हाररूपात. यंदाचा गणेशोत्सव मात्र याला अपवाद ठरल्याचे चित्र आहे. पारंपरिक रूपातील विशेषत विविध देवतांच्या रूपांतील गणेशमूर्तीनाच मूर्तिकार आणि भाविकांनी प्राधान्य दिले आहे.

यंदा घरोघरी आणि मंडपांत कोणत्या रूपातील गणेशमूर्ती पाहायला मिळणार याची उत्सुकता भक्तांना दरवर्षीच असते. गेली काही वर्षे एखाद्या चित्रपटातील व्यक्तिरेखेवर आधारित गणेशमूर्तीची स्थापना करण्यास प्राधान्य दिले जात असे.

यंदा मात्र ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील गणेश कार्यशाळांतून मूर्ती विकत घेणाऱ्या भाविकांनी पारंपरिक रूपातील मूर्तीनाच प्राधान्य दिले आहे.

सावळ्या रंगाने सजलेली, भाळी चंदन रेखलेली, कटीवर हात आणि गळ्यात तुळशीमाळ अशा विठ्ठलरूपी गणेशमूर्तीला यंदा अधिक मागणी आहे. याबरोबरच साई गणेश, स्वामी समर्थ, लालबागचा राजा, दगडुशेठ हलवाई, सिद्धिविनायक, बालाजी, बालगणेश, पगडी गणेश, पेशवाई मयूर, सरस्वती गणेश, कृष्ण रूपातील मूर्ती अशा विविध देवतांच्या रूपांतील पारंपरिक गणेशमूर्तीनाच मूर्तिकारांनी आणि भाविकांनी प्राधान्य दिले आहे, असे कल्याणच्या कुंभारवाडय़ातील मूर्तिकार प्रभाकर घोष्टेकर यांनी सांगितले. सोनेरी रंगाचे, मोदक खाणारे, गणेशासोबत बुद्धिबळ खेळणारे, चष्मा लावून वीणा वाजविणारे मूषकही गणेशभक्तांना आकर्षित करत आहेत.

संकेतस्थळावर बालमूर्तीना मागणी

मुख्य बाजारपेठेत विविध देवतांच्या रूपातील गणेशमूर्ती अधिक प्रमाणात दिसत असल्या तरी ऑनलाइन विक्रीत बालमूर्तीना अधिक मागणी आहे. संकेतस्थळे आणि समाजमाध्यमांवर या निरागस मूर्तीची नोंदणी अधिक प्रमाणात झाली आहे. बालकृष्णाबरोबर गळाभेट घेणारा गणेश, हनुमंताच्या मांडीवरील बाळगणेश, मोदकांच्या राशीमधील गणपती, तान्ह्य़ा बाळाच्या रूपातील मूर्ती अशा अनेक मूर्ती संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत आणि ग्राहकांकडूनही त्यांना चांगली मागणी आहे.

खडय़ांची प्रभावळ..

यंदा गणेशमूर्तीच्या दागिन्यांना सोनेरी रंग देण्याऐवजी खडय़ांची प्रभावळ तयार करण्यात आली आहे. भाविकांनाही ती मोहून घेत आहे. मुकुट, कंठी, कर्णफुले, हस्त अलंकारांपासून ते पीतांबर आणि शेल्यालाही खडय़ांची झालर लावण्याचा प्रयोग यंदा मूर्तिकारांनी केला आहे. या मूर्तीच्या किमती तुलनेने अधिक असल्याचे मूर्तिकार सुनील चाळके यांनी सांगितले.