मोरीवलीमधील घटना; माय-लेक जखमी

अंबरनाथमधील मोरीवली भागात शौचालयाच्या टाकीचा स्फोट होऊन माय-लेक जखमी झाल्याची घटना घडली आहे. अंबरनाथच्या मोरीवली परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

अंबरनाथ पश्चिमेकडील मोरीवली येथे घडलेल्या या दुघटनेत ११ वर्षीय आरती रामबहादूर चौधरी आणि तिची आई सुमित्रा या दोघी जखमी झाल्या आहेत. आरतीला स्फोटात उडालेला सिमेंटचा स्लॅब लागल्याने तिच्या नाकातोंडाला जखमा झाल्या आहेत, तर तिची आई सुमित्रा ही स्फोटाच्या धक्क्य़ाने बेशुद्ध झाली होती. या दोघी माय-लेकी रात्री मेणबत्ती घेऊन शौचालयात गेल्या होत्या. त्याच वेळी या शौचालयाच्या टाकीतून ज्वलनशील वायू निघण्यास सुरुवात झाली होती. मेणबत्तीच्या आगीशी संपर्क आल्याने वायूने पेट घेतला व स्फोट झाला. या स्फोटामुळे टाकीच्या स्लॅबचा काही भाग उडून तो आरतीच्या तोंडावर आदळल्याने त्यात ती जखमी झाली. त्यांना उपचारार्थ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या शौचालयांत निर्माण झालेला मल व त्यातून निर्माण होणारा वायू हे बाहेर पडण्यासाठी पन्हाळी काढण्यात आली नसल्याने ते शौचालयातच कोंडून राहतात. त्यामुळे त्याचा आगीशी संपर्क येऊन ही स्फोटाची घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या भागात ही शौचालये एमएमआरडीएने बांधलेली असून काही महिन्यांपूर्वी अंबरनाथच्या भेंडीपाडा परिसरात अशीच दुर्घटना झाल्याने तीन जण जखमी झाले होते. त्यामुळे एमएमआरडीएकडून करण्यात आलेली ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून आमच्या जिवाशी खेळ चालवला असल्याचे संतपाजनक वक्तव्य येथील नागरिक करत आहेत.