आरोग्य तपासणीपासून रोजगारापर्यंतच्या सुविधा एकाच ठिकाणी

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : अपंगांना शारीरिक तसेच आर्थिकदृष्टय़ा मजबूत करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेने पुढाकार घेतला असून त्यासाठी जिल्ह्य़ातील पहिले अत्याधुनिक बहुउद्देशीय केंद्र बदलापूरमध्ये उभारण्यात येणार आहे. बेलवली भागात उभ्या राहणाऱ्या या केंद्रात आरोग्य तपासणी, विविध उपचार, प्रशिक्षण, रोजगार अशा विविध बाबी करण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ३ टक्के रक्कम ही शहरांतील अपंगांसाठी वापरावी असा नियम आहे. गेल्या काही वर्षांपासून अपंगांचे आरोग्य, शिक्षण आणि उपचार यासाठी निधी खर्च केला जातो आहे. असे असले तरी आजही या लेखाशीर्षांखालील निधी पूर्णत: उपयोगात आणला जाताना दिसत नाही. त्यामुळे कुळगाव बदलापूर नगरपालिकेने अपंग बांधवांसाठी बहुद्देशीय केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. बदलापूर पश्चिमेतील बेलवली येथील आरक्षण क्रमांक १०५ येथील २६ गुंठे जमिनीवर हे केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे शहर अभियंता जयेश भैरव यांनी दिली.

तळमजल्यासह तीनमजली या इमारतीमुळे १५ हजार चौरस फुटांची जागा उपलब्ध होणार आहे. अपंगांना एकाच ठिकाणी विविध सुविधा देण्याचा प्रयत्न या बहुद्देशीय केंद्राच्या माध्यमातून केला जाणार आहे.

अ‍ॅक्युप्रेशर थेरपी केंद्र, व्यायामशाळा, साहित्य साधने, उपकरणे देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता अशा सुविधा या केंद्रातून पुरवल्या जातील. त्यासाठी तपासणी कक्ष, उपचार कक्ष, आराम कक्ष, उपाहारगृह अशा गोष्टी या केंद्रात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

शासनाच्या विविध उपक्रमांद्वारे अपंगांना प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी आवश्यक शिबिरे या केंद्रात आयोजित करण्यात येतील. या इमारतीमध्ये अपंगांना सहज वावरता यावे, यासाठी विशेष सोयी उभारण्यात येणार आहेत, या कामासाठी एकूण चार कोटी ९५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून लवकरच काम सुरू केले जाईल.

– प्रकाश बोरसे, मुख्याधिकारी,  नगरपालिका