ठाणे शहराला भेदून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका शहरांतर्गत रस्ता वाहतुकीला बसू लागल्याने शुक्रवारी, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या मार्गावर वाढणाऱ्या वाहनांच्या गर्दीचा ठाणे वाहतूक पोलिसांनी धसका घेतला आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने भाविक जात असतात. या भाविकांच्या वाहनांमुळे दरवर्षी गुरुपौर्णिमेला मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी होते. त्यातच यंदा या दिवसाला जोडून शनिवार आणि रविवार आल्याने वाहनांची गर्दी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे या वाहनगर्दीचा फटका ठाण्यातील वाहतुकीला बसू नये, यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी जोरदार तयारी केली असून महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीच्या नियोजनासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर रूप धारण करू लागली आहे. शहरातील अनेक भागातील रस्ते अरुंद असल्याने त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. तसेच महापालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरात पुरेशी वाहनतळाची सोय नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी राहत आहेत. परिणामी, शहरातील वेगवेगळ्या भागातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ठाणे स्थानक परिसर, गावदेवी, गोखले मार्ग, तलावपाळी, राम मारुती रोड, ठाणे पूर्व स्थानक परिसर अशा महत्त्वाच्या भागात वाहतूक कोंडीची समस्या प्रकर्षांने जाणवत आहे. असे असतानाच ठाणे शहराला भेदून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरही वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अंतर्गत रस्त्यावरील कोंडीत अधिक भर पडू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर, ठाणे वाहतूक पोलिसांनी यंदा ठाणे आणि भिवंडी भागात मोठय़ा प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात केले आहेत. ठाणे तसेच भिवंडी विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त, १५ अधिकारी आणि १०० पोलीस कर्मचारी, असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली.

शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. याशिवाय, गुरुपौर्णिमा, नववर्ष, दिवाळी, दसरा आदी दिवशी शिर्डीला दर्शनासाठी भाविक मोठय़ा संख्येने जातात. त्यामुळे या दिवशी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होते. परराज्यातून येणारे भाविकदेखील मुंबईत उतरून या मार्गानेच शिर्डी गाठतात. त्यामुळे या दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. या वाहतूक कोंडीचा फटका ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीला बसतो. – डॉ. रश्मी करंदीकर, वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त