News Flash

विकासकाची सदनिका देण्यास टाळाटाळ

२५ वर्षांपासून संघर्ष; ‘निखिल बिल्डर्स’ने अद्याप घर दिले नसल्याचा आरोप

२५ वर्षांपासून संघर्ष; ‘निखिल बिल्डर्स’ने अद्याप घर दिले नसल्याचा आरोप
डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील श्रीराम वाडीतील (गोखलेवाडी) रहिवासी दिवंगत गणेश अवसरे यांना चाळींच्या पुनर्विकासातून बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये सदनिका देण्याचे आश्वासन विकासक विकास तथा राजाभाऊ पाटकर यांनी दिले होते. या सदनिकेसाठी अवसरे कुटुंबीयांनी २५ वर्षांपूर्वी जुळवाजुळव करून २३ हजार रुपये पाटकर यांच्या निखिल बिल्डर्स या बांधकाम कंपनीत भरणा केले होते. दरम्यानच्या काळात गणेश अवसरे यांचे निधन झाले. त्यानंतर राजाभाऊ पाटकर यांनी पुनर्विकासातील प्रकल्पात सदनिका नाहीच, पण या घरासाठी घेतलेले २३ हजार रुपयेही अवसरे यांना परत केले नाहीत. सदनिका मिळावी यासाठी गेल्या २५ वर्षांपासून आमचा संघर्ष सुरू आहे. तरीही त्याला विकासक पाटकर दाद देत नाहीत, अशी तक्रार दिवंगत गणेश अवसरे यांचा मुलगा किरण यांनी केली आहे.
किरण अवसरे यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार श्रीराम वाडीतील चाळीत त्यांचे कुटुंब राहात होते. श्रीरामवाडीचे मालक मोहन पूरकर यांनी वाडीच्या विकासाचा करार आपली मालकीहक्क असलेल्या निखिल बिल्डर्स या कंपनीबरोबर १९८८ मध्ये केला. अन्य भाडेकरूप्रमाणे गणेश अवसरे यांनीही १ लाख १६ हजार ३३० रुपयांमध्ये सदनिकेसाठी रक्कम भरण्याचा निर्णय घेतला. पहिला हप्ता म्हणून पैशांची जुळवाजुळव करून त्यांनी २३ हजार रुपये विकासक कंपनीत भरणा केले. कराराप्रमाणे ५५३ चौरस फुटांची सदनिका देण्याचे मान्य करण्यात आले होते. उर्वरित रक्कम चार हप्त्यांमध्ये देण्याचे ठरले होते. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर सदनिका मिळावी, अशी मागणी अवसरे यांनी केली. मात्र पहिल्या इमारतीत शक्य नसल्याने नंतर होणाऱ्या इमारतीत तुम्हाला जागा देऊ, असे विकासकाने सांगितले होते. मात्र नंतर दुसरी इमारत उभी राहिलीच नाही. अखेर राहण्याची अडचण झाल्याने नंतर आम्ही दुसरा निवारा शोधला, असा अवसरे यांचा दावा आहे.

विकासकाने नियमानुसार आमचे हक्काचे घर आम्हाला द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. घरांच्या विवंचनेत कुटुंबाचे हाल झाले. त्या धावपळीत आई सीमा अवसरे यांना पक्षाघाताचा झटका आला. आता सदनिका अथवा पर्यायी जागा देणार नसाल तर, उपोषण करण्याचा इशारा किरण अवसरे यांनी दिला आहे.

हा तर ब्लॅकमेलिंगचा प्रकार
२५ वर्षांपूर्वी अवसरे यांनी निखिल बिल्डर्सबरोबर सदनिका मिळण्याबाबत करार केला होता. ती कंपनी आता बंद पडली. भागीदार सोडून गेले आहेत. जुनी कागदपत्रे राहिली नाहीत. अवसरे हे पुनर्विकासासाठी लाभार्थी होते. त्यांची खोली २०२ चौरस फुटांची होती. या सगळ्या व्यवहाराचे त्यांनी कागदपत्र आणून दिले तर, आपण त्यांना जागा देण्यास तयार आहोत. पण ते ५५० चौरस फुटांची जागा मागत आहेत. पुनर्विकासातील ८७ भाडेकरू जर समाधानाने राहू शकतात, तर अवसरेच का बाजूला राहिले; हे पण विचार करण्यासारखे आहे. सज्जनपणाचा भाग असेल तर, अवसरे यांनी आपणास कागदोपत्री सगळे पुरावे द्यावेत. त्यांना माणुसकीच्या भावनेतून सहकार्य करण्यास आपण तयार आहोत. सध्या ते माझी नाहक बदनामी करीत आहेत. हे गैर आहे. ते सतत आपणास उपोषण करीन, वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध करून आणीन, अशा प्रकारे बोलून ब्लॅकमेलिंग करीत असतात.
-राजाभाऊ पाटकर, विकासक, डोंबिवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 12:03 am

Web Title: the house was not charged yet form nikhil builders
Next Stories
1 बदलापूर पालिकेचे ‘स्वच्छता अभियाना’कडे पाऊल
2 ब्रह्मांड कट्टय़ावर कवितांचा जागर
3 ‘त्या’ चिमुकल्याला वाचविणाऱ्याचा शोध लागला
Just Now!
X