गणेशोत्सवाचा सण सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात, याला डहाणू-घोलवडमधील पारशी समुदायही अपवाद नाही. यंदाच्या वर्षी डहाणूमधील किमान चार पारशी कुटुंब श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करणार असून त्यापैकी दोन कुटुंब गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून श्रींचे आराध्य करत आहेत. यापैकी तिघांचे श्रीगणेश हे मराठी कुटुंबात बसणार असून जातीय सलोख्याचेदेखील एक उत्तम उदाहरण आहे.

घोलवड येथील राजेंद्र जोशी यांच्या आजोबांच्या काळापासून खोदादाद बेहराम इराणी आणि शाहरुख फिरोजभाई इराणी यांची कुटुंब श्रीगणेशाची स्थापना करत आहे. विधिवत पूजन व प्रसाद-नैवेद्यच्या या पारशी कुटुंबीयांना सहजगत जमत नसल्याने ही कुटुंबीय राजेंद्र जोशी यांच्या घरीच श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करतात. यंदाच्या वर्षीपासून डोनेश इराणी यांच्या आणखी एक पारशी कुटुंबाच्या श्रीगणेशाची या घरामध्ये प्रतिष्ठापना होणार आहे.  इराणी कुटुंबीय स्वत: प्रतिष्ठापना, दिवसातील पूजेला-आरतीला तसेच विसर्जनादरम्यान ही मंडळी आपल्या कुटुंबासह उत्साहाने सहभागी होतात. जोशी कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीकडून ही परंपरा घोलवडमध्ये सुरू ठेवली आहे. डहाणू येथील पर्सी भरडा यांची चौथी पिढी येथे वास्तव्य करीत असून चारशे-साडेचारशे वर्षांपूर्वी या भागात स्थायिक झालेल्या पारशी कुटुंबांपैकी त्यांचे हे एक कुटुंब आहे. २००० पासून गणपतीची प्रतिष्ठापना आपल्या घरी करीत आहेत.