सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा विरोध; गुगल मॅप, उपग्रह प्रणाली वापरण्याची सूचना
कल्याण-डोंबिवली पालिकेची आर्थिक स्थिती तोळामासाची असताना, शहरातील नव्या, जुन्या मालमत्ता शोधण्यासाठी प्रशासनाने दहा कोटी खर्च करण्याची तयारी केल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण-डोंबिवलीत सव्वा लाख मालमत्ता, तर २७ गावांमध्ये ९० हजार मालमत्ता आहेत. या व्यतिरिक्तच्या मालमत्ता प्रशासन गुगल मॅप, उपग्रह संदेश प्रणालीद्वारे शोधू शकते. या तंत्रज्ञानात्मक सुविधा उपलब्ध असताना, कडकीच्या दिवसात प्रशासनात दहा कोटी रुपये ठेकेदाराच्या घशात का घालू पाहत आहे, अशी सडकून टीका सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली आहे.
पालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणे, मालमत्तांवर जी. आय. एस. प्रणालीवर आधारित क्रमांक टाकणे, मालमत्तांचे संगणकीकरण करणे या कामांसाठी पालिकेने प्रत्येक घरामागे ४०८ रुपये मोजून एक एजन्सी नेमण्याचा घाट घातला आहे. या एजन्सीने शहरातील मालमत्ता मोजण्याचे काम करायचे आहे. पालिकेचा मालमत्ता विभाग, संगणक विभागात मालमत्तांची माहिती उपलब्ध आहे. या मालमत्ता वगळून ज्या नवीन मालमत्ता आहे. त्यांचा शोध प्रशासनाने घ्यावा. त्यासाठी गुगल मॅप, उपग्रह प्रणालीतील नकाशांचा वापर केला तर, बसल्या जागी प्रशासनाला एक पैसा खर्च न करता, सगळी माहिती मिळू शकेल. केवळ ठेकेदारांच्या घशात घालण्यासाठी दहा कोटी रुपये देऊन प्रशासन कोणाची दिवाळी साजरी करीत आहे, असा प्रश्न नगरसेवक वामन म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
पालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. कर वसुलीसाठी प्रशासनाने रात्रीचा दिवस केला आहे. कर्मचारी वर्गही हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न अन्य नगरसेवकांनी उपस्थित केला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीका केल्याने, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाने या विषयाचा फेरविचार करण्याचे आदेश दिले.
तर नगरविकास विभागाकडे तक्रार
प्रशासनाने महासभेला डावलून हा विषय मंजूर करण्याचा घाट घातला तर, या प्रकरणाची नगरविकास विभागाकडे तक्रार करण्यात येईल, असे म्हात्रे यांनी सांगितले. आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीची अधिकारी, ठेकेदार यांनीच उधळपट्टी केली. त्यामुळे या शहराचा उकिरडा झाला आहे. किमान आता तरी विकास कामे करुन शहरवासीयांना स्वस्थ जीवन जगू द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कर्मचाऱ्याचा कर वसुली उद्योग
पालिकेच्या डोंबिवलीतील ‘फ’ प्रभागातील कर विभागातील एका कर्मचाऱ्याने नवीनच उद्योग सुरू केला आहे. हा कर्मचारी ठाकुर्ली, कांचनगाव येथे नव्याने उभ्या राहिलेल्या नवीन इमारतींना मालमत्ता कर लावण्याची कामे सध्या करीत आहे. नवीन इमारतीमधील सदनिकांची मोजमापे घेण्यासाठी हा कर्मचारी कर विभागातील कोणाही कर्मचाऱ्याला सोबत नेत नाही. हा कर्मचारी आपल्या घरातील दोन मुलांना मोजमाप घेण्यात येणाऱ्या सोसायटीच्या ठिकाणी बोलावतो. त्यांच्या साहाय्याने हा कर विभागातील ठाणमांडय़ा कर्मचारी घरमालकाच्या सदनिकेची मोजमापे घेतो. मग, घर मालकाशी संधान साधून सदनिकेचा मालमत्ता कर कसा कमी लागेल आणि खासगीत आपला खिसा कसा भरेल, असे उद्योग हा कर विभागातील द्रव्यलंपट कर्मचारी मोठय़ा प्रमाणात करीत आहे. या कर्मचाऱ्याच्या या उद्योगाची जोरदार चर्चा पालिकेत सुरू आहे.

प्रभाग अधिकाऱ्यांच्या समोर बांधकामे
पालिकेच्या आठ प्रभागातील प्रभाग अधिकाऱ्यांना नवीन मालमत्ता कोठे, कशा उभ्या राहत आहेत, याचे पक्के ज्ञान आहे. चाळीच्या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहूनही त्या इमारतींना चाळींचा मालमत्ता कर, पाणी देयक आकारण्यात येत आहे. याची माहिती कर, पाणी विभागातील अधिकाऱ्यांना आहे, असे एका नगरसेवकाने सांगितले. वर्षांनुवर्ष कर, पाणी विभागातील कर्मचारी अशा मालमत्ताधारकांकडून चिरीमिरी घेऊन ही मालमत्ता कर चोरीची प्रकरणे दडपून ठेवीत आहेत, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.