News Flash

सृजनाची फॅक्टरी : ४८ तासांतली अष्टावधानी कलाकृती.. ‘द लास्ट सपर’

विशेष म्हणजे त्यांनी अवघ्या ४८ तासांत केलेल्या लघुपटाचा सवरेत्कृष्ट लघुपट म्हणून गौरव करण्यात आला.

 

४८ तास म्हणजे दोन दिवस आणि दोन रात्रीचा काळ. साधारणत: कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचण्यापूर्वी दोन दिवसांची मुदत अथवा इशारा देण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. कोणतेही युद्ध किंवा आंदोलन पुकारण्यापूर्वी समोरच्याला विचार करण्यासाठी अशा प्रकारची मुदत दिली जाते. मात्र सर्जनशील तरुणांच्या विश्वात हे ४८ तास म्हणजे केवळ अशा प्रकारचा प्रतीक्षा कालावधी नसतो. विशेषत: दृकश्राव्य माध्यमाची शक्ती लघुपटांच्या माध्यमातून आजमावू पाहणाऱ्यांसाठी हे ४८ तास खूपच महत्त्वाचे असतात. ठाण्यातील एका तरुणांच्या समूहाने अवघ्या ४८ तासांत लघुपट निर्मिती करण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे त्यांनी अवघ्या ४८ तासांत केलेल्या लघुपटाचा सवरेत्कृष्ट लघुपट म्हणून गौरव करण्यात आला. त्या तरुणांसाठी हा सारा प्रवास एका सुंदर स्वप्नासारखाच होता. त्यामुळेच ‘अवाँतगड प्रोडक्शन्स’च्या ‘द लास्ट सपर’ या लघुपटाचे ‘मेकिंग ऑफ’ प्रत्यक्ष कलाकृतीइतकेच चित्तवेधक आहे..

संध्याकाळची वेळ असते. घरात अहमदची पत्नी आणि त्याचे अब्बू असतात. तेवढय़ात कुणीतरी दार ठोठावते. अहमदच्या पत्नीने दरवाजा उघडल्यावर दौलत खान अर्थात इन्शुरन्स पॉलिसी एजंट आल्याचे कळते. दौलत अब्बूंशी त्यांच्या पॉलिसी संबंधित काहीतरी बोलायचे आहे, असे तो सांगतो. अब्बू औषध घेऊन घराच्या कोपऱ्यात एका पलंगावर आराम करत असतात. अहमदची बायको अहमदला फोन करून दौलत खान आल्याचे कळवते. दौलत पॉलिसीच्या काही कागदपत्रांवर अब्बूंची सही घेत असतो. तेवढय़ात घरी आलेला अहमद पॉलिसीपोटी किती रक्कम मिळेल, असे विचारतो. तेव्हा दौलत ‘३० लाख रुपये मिळतील’ असे त्याला सांगतो. ते ऐकताच अहमदच्या पत्नीच्या डोक्यात निराळीच चक्रे फिरू लागतात. दौलत घराबाहेर जाताच ही अहमदला स्वयंपाक खोलीत बोलावते आणि विचारते ‘आज अब्बूनां खाऊ  घालूयात का?’ तिचा हेतू लक्षात येताच अहमदला घाम फुटू लागतो. मात्र अखेरीस तोही आजूबाजूचा अंदाज घेऊन घराबाहेरून काहीतरी विकत आणायला निघतो. एका दुकानापाशी तो थांबतो. तिथून काहीतरी विकत घेतो आणि लपत लपत घराच्या मार्गावर निघतो. तेवढय़ात दौलतची नजर त्याच्यावर पडते. तो अहमदला हाक मारू लागतो. मात्र दौलतची हाक ऐकताच अहमद पळू लागतो आणि थेट घरातच येऊन थांबतो. हातात असलेली पिशवी त्याच्या बायकोच्या हातात देतो आणि ती लगेच लपवून ठेव असं सांगतो. तितक्यात घराची बेल वाजते आणि दरवाजा उघडताच समोर दौलत उभा असतो. ‘हाक मारल्यावर थांबलात का नाही’ असे विचारल्यावर मला काही ऐकूच आले नाही असे अहमद सांगतो. घाई गडबडीत पॉलिसीच्या कागदपत्रांवर अब्बूंची एक स्वाक्षरी घेणे राहून गेलेले असते. त्यामुळे दौलत पुन्हा घरी आलेला असतो. ते काम करून तो पुन्हा निघून जातो. पण अहमद इतका घाबरलेला का असतो? त्या पिशवीत नेमके काय असते? अहमदची बायको अब्बूनां काय खाऊ  घालणार आहे? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘द लास्ट सपर’ या लघुपटाच्या शेवटच्या दहा सेकंदात आपल्याला मिळतात.

छायाचित्रण क्षेत्रात एकत्रच काम करत असल्यामुळे ठाण्यात राहणाऱ्या सागर रणदिवेची अमेय मापुस्कर आणि नयन शाह यांच्यासोबत मैत्री झाली. आपण आपली काम करता करता काहीतरी वेगळं आणि आव्हानात्मक करू अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि ‘द ४८ अर्वस फिल्म प्रोजेक्ट’ या ४८ तासांत लघुपट बनवण्याच्या स्पर्धेत भाग घेण्याचे त्यांनी ठरवले. स्पर्धेची माहिती मिळविल्यावर या तिघांनी आणखी काही मित्रांना आपल्यासोबत सहभागी करून घेतले आणि दहा जणांचा एक ग्रुप उभा केला. ‘अवाँतगड’ अर्थात सर्जनशील लोकांचा संघ या फ्रेंच शब्दाच्या नावाने त्यांच्या ‘अवाँतगड प्रोडक्शन्स’ची सुरुवात केली. सर्वचजण स्पर्धेच्या पूर्वतयारीला लागले. चिठ्ठी उचलल्यावर ‘सस्पेन्स थ्रीलर’ असा विषय त्यांना लघुपट बनवण्यासाठी मिळाला. विषयासोबत त्यांना अजून काही अटीही दिल्या गेल्या. त्यानुसार लघुपट हा आठ मिनिटांचाच असणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे लघुपटाची कथा ही नवीनच असली पाहिजे. लघुपटात कॅप्सूलचा (औषधाचा) उपयोग झालाच पाहिजे. लघुपटात दौलत खान नावाचा इन्शुरन्स एजंट असला पाहिजे आणि ‘ये सब पैसे का खेल है, हैं ना?’ हे वाक्य लघुपटात असलं पाहिजे, अशा ५ अटींची पूर्तता करूनच लघुपट तयार करायचा होता. संध्याकाळी ७.३० वाजता विषय मिळाल्यानंतर पहाटे सहावाजेपर्यंत जागरण करून विपुल पाटील आणि गौरव मदनने लघुपटाची संपूर्ण पटकथा लिहून काढली. विक्रांत कोळपे, स्नेहा साळवी, हेमंत हजारे आणि विपुल काळे या चार कलाकारांसोबत सकाळी दहा वाजल्यापासून लघुपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली. अमेयने दिग्दर्शकाची तर नयनने छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडली. गौरव मेंडोन आणि राधिका गावंड या दोघांनी प्रोडक्शनवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले. दुर्गेश बैत आणि रोहन मापुस्कर यांनी साहाय्यक छायाचित्रणकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली व अनुज छेडा याने प्रकाश योजना सांभाळली. पहाटे तीन वाजता चित्रीकरण पूर्ण झाले.

छायाचित्रण झाल्यावर मुख्य काम होते ते पोस्ट प्रोडक्शनचे. झोपेत एक क्षणही वाया न घालवता सागर रणदिवे याने एडिटिंगच्या कामाला, गौरव मदनने ग्राफिक डिझाइनला व मोनू बीडने साऊंड आणि संगीताच्या कामाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता फिल्मचे सगळे काम पूर्ण झाले व फिल्मच्या रेंडरिंग अर्थात फाईल सेव्ह करण्यास सुरुवात केली, त्याला अंदाजे एक तास लागणार होता. पण घडय़ाळात सहा वाजले होते तरी रेंडरिंग पूर्ण होत नव्हतं. सगळे जण खूप चिंतेत होते व संपूर्ण फिल्म परत रेंडरिंग करावी लागणार होती. शेवटी ७ वाजता फिल्म रेंडर झाली व अमेय बरोबर ७.३० वाजता फिल्म सबमिट करण्याच्या ठिकाणी पोहोचला व शेवटी ‘द लास्ट सपर’ हा लघुपट स्वीकारला गेला. ‘द ४८ अवर्स फिल्म प्रोजेक्ट’ या स्पर्धेत ‘द लास्ट सपर’ या लघुपटाने सर्वोत्तम लघुपटाचं परितोषिक पटकावले. यासोबतच सर्वोत्तम स्क्रीनप्लेचे पारितोषकही याच लघुपटाला मिळाले. ‘आरंभ लघुपट महोत्सव’ या स्पर्धेत ‘द लास्ट सपर’ ला सर्वोत्तम अभिनेत्री व सर्वोत्तम संगीत अशी दोन पारितोषिके जाहीर करण्यात आली. सध्या ‘अवाँतगड प्रोडक्शन्सने’ कर्जतच्या शबरी सेवा समितीसाठी एक माहितीपट बनवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासोबतच त्यांची एक हॉरर वेब सीरिज करण्याची तयारी सुरू आहे. ती आपल्याला युटय़ुबवर जानेवारी २०१७ पासून पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:20 am

Web Title: the last supper short film
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनातून व्यक्तिमत्त्व विकास
2 कॉलेजच्या कट्टय़ावर : चित्रपट करमणुकीबरोबरच अभ्यासाचे माध्यम
3  खेळ मैदान : बास्केटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन शाळा अव्वल
Just Now!
X