कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तीन वर्षांपूर्वी नेमलेल्या समितीकडून उपाययोजना नाही

नीलेश पानमंद
ठाणे : महापालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाचे पाणी साचणाऱ्या १३ सखल भागांचा सविस्तर अभ्यास करून त्याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी नेमण्यात आलेल्या समितीचा कार्यभार म्हणजे फुकाच्या घोषणा ठरल्या आहेत. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या समितीमध्ये बांधकाम तसेच महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी-अभियंत्यांचा समावेश केला होता. या समितीचा कारभार कागदी घोडे नाचविण्यापलीकडे झाला नसल्याने सखल भागातील परिस्थिती जैसे थेच असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील पाच ठिकाणी पावसाचे पाणी साचू नये यासाठी उपाययोजना केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला असला तरी ही सर्व ठिकाणे १३ सखल भागांच्या यादीतील नाहीत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते तसेच गृहसंकुलांच्या आवारात पाणी साचण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर येत आहेत.साचलेल्या पाण्यातून वाट काढणे नागरिकांना शक्य होत नाही. काही वेळेस आसपासच्या घरांमध्ये पाणी शिरते आणि यामुळे घरातील वस्तू, साहित्यांचे नुकसान होते. रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काही वेळेस साचलेल्या पाण्यामध्ये वाहने बंद पडतात. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या सखल भागांमध्ये ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तीन वर्षांपूर्वी एक समिती नेमली होती. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता.

शहरात पाणी साचणाऱ्या १३ सखल भागांचा सविस्तर अभ्यास करून या ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश तत्कालीन आयुक्त जयस्वाल यांनी दिले होते. त्या १३ सखल भागांमध्ये पाणी का साचते, याठिकाणी पाणी साचू नये किंवा साचलेल्या पाण्याचा लगेच निचरा कसा करता येईल, याचा अभ्यास समितीने सुरू केला होता. तीन वर्षांचा काळ लोटला तरी समितीने अद्याप एकाही ठिकाणी उपाययोजना केलेली नाही. यातील चिखलवाडी भागात नाल्याचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असून ते काम अजूनही अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणची समस्या अद्याप सुटू शकलेली नाही. तसेच उर्वरित १२ ठिकाणीही पाणी साचत असल्याचे दिसून येते.

ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाचे पाणी साचणाऱ्या १३ सखल भागांमध्ये कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या समितीने अहवाल दिला होता. त्यामध्ये काही भागात नाल्यांमध्ये कचरा अडकून पाणी साचत असल्याचे समोर आले होते, तर भरतीच्या वेळेत खाडीमध्ये पावसाचे पाणी जात नसल्यामुळे वृंदावन आणि श्रीरंग भागात पाणी साचत असल्याचे समोर आले होते. १३ पैकी ५ ठिकाणी नाले बांधणी तसेच कल्वर्टची कामे केली आहेत. त्यामध्ये पनामा कंपनीजवळील नाला, जवाहरनगर येथील एका सोसायटीजवळ कल्वर्ट बांधणी, प्रथमेश बंगला आणि लीलावती सोसायटीजवळ नाला बांधणी, खारेगाव भागातील नाल्याचे पाणी खाडीत सोडणे, मुंब्रा दर्गारोड येथे नाला बांधणी अशी कामे करण्यात आली आहेत. उर्वरित वंदना सिनेमागृहाजवळील परिसर, वृंदावन आणि श्रीरंग सोसायटी परिसर, मुंब्य्रातील बॉम्बे कॉलनी या भागांमध्ये उपाययोजना करण्याचे काम लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे नगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी दिली.

हे भाग दरवर्षी पाण्यात

’ नौपाडा प्रभाग समिती : ठामपा प्रशासकीय भवनाजवळील डॉ. अल्मेडा रस्ता येथील डेबोनार सोसायटी, वंदना सिनेमागृहाजवळील लालबहादूर शास्त्री मार्ग, राम मारुती रोड येथील गजानन महाराज मंदिर आणि गडकरी पथ चौक, गोखले रोड येथील देवधर रुग्णालय, जिजामाता मंडईजवळील मासुंदा तलावालगतचा शिवाजी पथ, एम. जी. रोड येथील पंपिंग स्टेशन-चिखलवाडी, एल.बी.एस. मार्ग येथील चव्हाण चाळ.

’ उथळसर प्रभाग समिती : वृंदावन सोसायटी तसेच श्रीरंग सोसायटी.

’ माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती : घोडबंदर रोड येथील पंचामृत सोसायटीजवळील रिलायन्स फ्रेश मॉलसमोरील परिसर, घोडबंदर रोड येथील आय.सी.आय.सी.आय. बँकेजवळील परिसर.

’ कळवा प्रभाग समिती : विटावा रेल्वे पुलाखाली बेलापूर रस्ता.

’ मुंब्रा प्रभाग समिती : दिवा गाव