ठाणे पालिकेतील भ्रष्टाचाराची जुन्या प्रकरणांची पुन्हा चौकशी;
नंदलाल अहवालानुसार माजी अभियंत्यांविरोधात आरोपपत्र
ठाणे महापालिकेतील १९८७ ते ९६ या दहा वर्षांच्या काळातील कंत्राटी कामांमधील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या नंदलाल समितीच्या अहवालाचे भूत आता पुन्हा एकदा प्रशासन आणि नगरसेवकांच्या मानगुटीवर बसण्याची चिन्हे आहेत. या काळातीलच एका प्रकरणात तत्कालीन अभियंत्यांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यास मनाई करणारा ठाणे पालिकेतील नगरसेवकांचा सुमारे ९ वर्षांपूर्वीचा ठराव विखंडित करण्यास राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता त्या काळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी पुन्हा सुरू होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुका जवळपास आठ महिन्यांवर होऊ घातल्या असताना राज्यातील भाजप सरकारने ही प्रकरणे उकरून काढण्यास सुरुवात केली आहे. १९८७ ते ९६ या कालखंडातील कंत्राटी कामांच्या गैरव्यवहारांची इतर प्रकरणेही यानिमित्ताने नव्याने चर्चेत येण्याची शक्यता आहे. या गैरव्यवहारांमध्ये पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वपक्षीय नेतेमंडळींचा समावेश असल्याचे बोलले जाते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही प्रकरणे बाहेर काढत भाजपने पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेची कोंडी करण्याची खेळी चालवल्याचे बोलले जात आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात रस्त्यांवर सोडियम व्हेपर दिवे बसवण्याच्या कामात झालेल्या अनियमिततेप्रकरणी नंदलाल समितीच्या अहवालानुसार महापालिकेतील १४ नगरसेवकांविरोधात यापूर्वी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणाचा तपास पुढे थंडावला. याच प्रकरणात महापालिकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ अभियंता टी. सी. राजेंद्रन आणि एस. एस. सोलंकी यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासंबंधीचा प्रस्ताव २००७ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मांडला होता. मात्र, नगरसेवकांनी एकमताने तो फेटाळून लावला व तसा ठराव ऑक्टोबर २००८ मध्ये प्रशासनाकडे पाठवण्यात आला. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी हा ठराव विखंडित करण्यासाठी नगरविकास विभागाकडे विनंती केली होती. मात्र, गेल्या आठ वर्षांत त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. नंदलाल समितीने ठपका ठेवलेल्या अभियंत्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न नगरसेवक करत असताना तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने हे प्रकरण प्रलंबित ठेवत दोषी अभियंत्यांना एक प्रकारे पाठीशी घातले होते. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होत नाही तोवर नंदलाल समितीच्या अहवालानुसार पुढील तपास करणे शक्य नसल्याचे मत ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मध्यंतरी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र पाठवून व्यक्त केले होते. पोलिसांचे पत्र प्राप्त होताच जयस्वाल यांनी २००८ सालचा नगरसेवकांचा ठराव विखंडित करण्याची विनंती नगरविकास विभागाकडे केली होती. जयस्वाल यांची विनंती तात्काळ मान्य करत नगरविकास विभागाने नगरसेवकांचा ठराव विखंडित केला असून महापालिकेचे सेवानिवृत्त अभियंते टी.सी. राजेंद्रन आणि एस.एस. सोलंकी यांच्याविरोधात न्यायालयात आता आरोपपत्र दाखल होणार आहे.

प्रकरण काय?
ठाणे महापालिका क्षेत्रात रस्त्यांवर सोडियम व्हेपर दिवे लावण्याप्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही वर्षांपूर्वी झाला होता. याशिवाय महापालिकेतील कंत्राटी कामांमध्ये टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी केला होता. त्यानुसार राज्य सरकारने नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. नंदलाल यांनी या प्रकरणी सादर केलेल्या अहवालात नगरसेवक, अभियंते तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कंत्राटी कामातील अनियमिततेसंबंधी ठपका ठेवला होता. या प्रकरणी १४ नगरसेवक तसेच काही अधिकाऱ्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, सर्वसाधारण सभेत अभियंत्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासंबंधीचे ठराव फेटाळले होते.