भारतातील वन्यजीवन, निसर्ग, लहान मुलांच्या भावछटा, देशविदेशातील पर्यटनस्थळे आदी विषयांवर ‘रानवाटा’तर्फे ठाण्यातील कापुरबावडी येथील कलाभवनात झालेल्या छायाचित्र प्रदर्शनाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २ ते ५ एप्रिल दरम्यान झालेल्या या प्रदर्शनाला ठाण्याचे महापौर संजय मोरे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह चार हजार रसिक प्रेक्षकांनी भेट दिली.
नवोदित ६० छायाचित्रकारांची ४०० प्रकाशचित्रे या प्रदर्शनात सादर करण्यात आली होती. दैनंदिन जीवनातील घडामोडी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न या छायाचित्रकारांनी केला होता. वन्यजीवांच्या हालचालींचे बारकावे योग्य पद्धतीने या प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता आला. महापौर संजय मोरे यांनी शुक्रवारी या प्रदर्शनाला भेट देऊन छायाचित्रकारांच्या कलाकृतींचे कौतुक केले. पाली खोपोली परिसरात असलेल्या मृगगड अशा दुर्लक्षित गड किल्ल्याची चित्रफीत पाहून रानवाटा संस्थेच्या छायाचित्रकारांना विशेष दाद दिली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि जाहिराततज्ज्ञ असणाऱ्या रवी जाधव यांनी प्रदर्शनाला भेट देऊन नवोदित छायाचित्रकारांशी थेट संवाद साधला. छायाचित्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची रवी जाधव यांनी मनमोकळी उत्तरे दिली.