परदेशात चांगल्या पगाराची नोकरी..मोठय़ा रकमेची लॉटरी..अशा स्वरूपाचे खोटे संदेश ई-मेलवर पाठवून नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार सध्या वाढीस लागले आहेत. अतिरेकी कारवाईसाठी ई मेल आय हॅक करण्याचे प्रकारही यापूर्वी उघडकीस आले आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेला व्यक्तिगत तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढ होत असताना यासंबंधीच्या सुरक्षिततेविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे नागरिक अशा टोळ्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तसेच अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या टोळ्या परदेशात असल्याने त्यांच्या मुसक्या आवळणेही पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी सायबर सुरक्षिततेचे धडे नागरिकांना देण्यास सुरुवात केली आहे. यासंबंधी पोलिसांनी काही सूचना नागरिकांना केल्या असून देशाच्या सुरक्षेसाठीही त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.

क्रेडीट व डेबीट कार्ड टिप्स..
’ क्रेडीट किंवा डेबीट कार्डाचा १६ अंकी क्रमांक तसेच पिन नंबर, कार्डाच्या मागील तीन अंकी सी.व्ही.व्ही क्रमांक आणि स्वत:ची व्यक्तिगत माहिती फोन किंवा ई-मेलवरून कोणालाही देऊ नका.
’ डेबीट कार्ड रद्द होणार आहे किंवा आपले के.वाय.सी अद्ययावत करावयाचे असल्याचे सांगून भामटे तुमची माहिती काढून घेतात. त्यामुळे अशा भामटेगिरीला बळी पडू नका.
’ ओ.टी.पी क्रमांक कुणालाही देऊ नका. ऑनलाइन फसवणुकीच्या व्यवहारासाठी वापरला जाऊ शकतो.
’ मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्या. जेणेकरून बँकेच्या व्यवहाराची माहिती त्वरित मोबाइल संदेशद्वारे मिळेल.
’ ए.टी.एम मशीनमध्ये पिन टाकताना तो कोणीही पाहणार नाही, यासाठी आपल्या हातावर दुसरा हात किंवा पेपर आडवा धरावा.
’ ए.टी.एम सेंटरमध्ये पैसे काढताना अन्य कोणालाही आत येण्यास मज्जाव करा.
’ नेट बँकिंग किंवा क्रेडीट/डेबीट कार्डचे व्यवहार सायबर कॅफे तसेच मोफत वायफायच्या ठिकाणी करू नका.

सायबर सुरक्षिततेसाठी
’ आपले फोटो, पासवर्ड, फोन नंबर आणि कुटुंबाची माहिती आदी सोशल मीडियावर शेअर करू नका.
’ सोशल मीडियावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीला प्रत्यक्षात एकटे भेटू नका.
’ सोशल मीडियावर आक्षेपार्ह, भडकाऊ संदेश पाठवू नका आणि अश्लिल चित्रफित व चित्रे पाठवू नका. हा कायद्याने गुन्हा आहे.
’इंटरनेटवरून पायरेटेड चित्रपट, गाणी, गेम्स आणि व्हीडिओ डाऊनलोड करू नका.
’ नेट बँकिंग व ईमेलचे पासवर्ड वरचेवर बदलत रहा. पासवर्ड किमान आठ अक्षरांचा असावा. त्यात इंग्रजीतील लहान मोठी अक्षरे, चिन्हे व अंकाचा समावेश असावा.
’आपला वाय-फाय चांगल्या पासवर्डने सुरक्षित ठेवा.
’ परदेशात किंवा चांगल्या पगाराची नोकरी, मोठय़ा रक्कमेची लॉटरी किंवा बक्षीस आणि मुत्युपत्राद्वारे मोठय़ा रक्कमेचे आमिष दाखवून आलेल्या दूरध्वनी तसेच संदेशांना फसू नका.
’ अशा संदेशांना बळी पडून कोणत्याही अन्य खात्यांवर पैसे पाठवू नका.
’ नेहमी सर्च करावयाच्या वेब साइटचे अचूक नाव टाइप करून इंटरनेटवर सर्च करा.
’ ईमेलद्वारे संदेश पाठविण्यापूर्वी ई-मेल अ‍ॅड्रेस बारकाईने तपासा. एकसारख्या वाटणाऱ्या ई-मेलवर लॉगईन करून माहिती दिल्यास आपल्या माहितीचा आर्थिक व अन्य फसवणुकीसाठी गैरवापर होऊ शकतो.
’ ईमेलचा व नेट बँकिंगचा पासवर्ड वेगवेगळा ठेवा.
’ आपले बँकेचे व्यवहार नियमितपणे तपासा.
’ मोबाइल फोन अचानकपणे डीअ‍ॅक्टीवेट झाला तर त्वरित मोबाइल कंपनीशी संपर्क साधून माहिती घ्या. फोन बंद असताना डय़ुप्लीकेट सीमकार्ड घेऊन आपल्या खात्यातील पैसे नेट बँकिंगद्वारे काढले जाऊ शकतात.

फसवणुकीपासून सावध राहा
’ अल्पावधीत पैसे दुप्पट देतो, दामदुप्पट व्याज देतो आणि गुंतवणूक पुन:पुन्हा वाढवून देतो, अशी आमिषे दाखविणाऱ्या योजनांना बळी पडू नका.
’ पोकळ आश्वासने व अफवांवर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नका.
’ गुंतवणुकीबाबत कागदपत्रे वाचल्याशिवाय व त्यातील फायदे तोटे व धोका समजून घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका.
’ सर्व गुंतवणूक बँकिंगशी संबंध नसलेल्या वित्तीय कंपन्यांत करू नका. ज्या सेबी किंवा रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाशी सलग्न नाहीत.
’ नवीन स्थापन झालेल्या कंपन्या तसेच बँकिंगशी संबंध नसलेल्या वित्तीय कंपन्यांची बाजारातील पत पडताळणी केल्याशिवाय दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका करू नका.