सेनेच्या एका बडय़ा नेत्याने आश्वस्त केल्याने कलानी समर्थकांचे धाडस?

उल्हानगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या ९ नगरसेवकांनी पक्षादेश धुडकावत शिवसेनेच्या लीलाबाई आशान यांना मतदान केले. पक्षादेश मोडल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या एका बडय़ा नेत्याने आश्वस्त केल्याने कलानी समर्थक नगरसेवकांनी हे केल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उल्हासनगर महापालिका महापौरपदाच्या  निवडणुकीच्या निमित्ताने नगरसेवक पळवापळवीचा खेळ पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीत डावलल्याने संतापलेल्या कलानी समर्थक ९ नगरसेवकांना शिवसेनेने आपल्या गळाला लावले. यामध्ये  भाजपच्या मावळत्या महापौर पंचम कलानी यांचाही समावेश होता. तर भाजपनेही शिवसेनेच्या गोटात प्रवेश करू इच्छिणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेला आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले अहे. उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नाटय़मय घडामोडींची एक मालिकाच यंदाही पाहायला मिळाली.  ज्या ओमी कलानीच्या पाठिंब्यामुळे भाजपला महापालिकेत सत्ता मिळाली त्याच कलानी कुटुंबाला विधानसभा निवडणुकीत बाजूला सारणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याचा विडा ओमी कलानी यांनी उचलला होता. त्यानुसार भाजपच्या महापौरपदाचे उमेदवार आणि उल्हासनगरच्या राजकारणात कायम सत्तेच्या बाजूने असलेल्या जीवन इदनानी यांना शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

सभागृहात पोहोचत असतानाच भाजपच्या मावळत्या महापौर पंचम कलानी यांनी थेट शिवसेनेच्या बसमधून पालिका मुख्यालयात प्रवेश केला. त्या वेळी माजी आमदार ज्योती कलानीही उपस्थित होत्या.

दरम्यान, पक्षादेश धुडकावणाऱ्या नगरसेवकांवरील कारवाईसाठी अधिक वेळ जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार राज्यात स्थापन होत असल्याची चिन्हे असल्याने आपल्यावरील कारवाईचा अधिक काही फटका बसणार नाही, अशी आशा कलानी समर्थक भाजप नगरसेवकांना आहे. त्यामुळे कारवाईचा धोका पत्करून नगरसेवकांनी विरोध उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. त्याच वेळी भाजपने आपला महापौर पदाचा उमेदवार मागे घेतल्याने इतर उमेदवाराला मतदान करायचे नसल्याचे कारण देत नगरसेवक आपला युक्तिवाद करू शकतात. तसेच नगरसेवक पद रद्द झाल्यासही पुन्हा निवडून येण्याची शाश्वती मिळाल्याचीही चर्चा आहे.

शिवसेनेचे मुत्सदी राजकारण

निवडणुकीचा अर्ज भरल्याच्या दिवसापासून नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र कलानी समर्थक नगरसेवकांना यात जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपने केला. शिवसेनेच्या मुत्सद्दी राजकारणामुळे भाजपच्या गोटात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि टीम ओमी समर्थक भाजपच्या नगरसेवकांना पळवण्यात शिवसेनेला यश आले. एक अपक्ष आणि ९ भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले असे दहा नगरसेवक मिळवत शिवसेनेने भाजपला सत्तेतून खाली खेचले. मात्र त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील नगरसेविका सुमन सचदेव यांना आपल्याकडे ओढण्यात भाजपला यश आले. त्याचा फायदा भाजपला मिळू शकला नाही.