ठाण्यातील पाचपाखाडी भागातील रस्त्यामुळे पालिकेचे पितळ उघडे

गणेशोत्सवात मंडपासाठी खड्डे खोदणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा ठाणे महापालिका दरवर्षी देत असली तरी, यावर प्रत्यक्षात कधीच कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे. पाचपाखाडी येथील संत ज्ञानेश्वर चौक येथील रस्त्यावर एका बडय़ा नेत्याच्या मंडळाकडून गेल्या वर्षी मंडपासाठी खोदण्यात आलेले खड्डे अजूनही बुजवण्यात आलेले नाहीत. मंडळाने खड्डे बुजवण्याचे सौजन्य दाखवले नाहीच; पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही या मंडळावर कारवाई करण्याची धमक दाखवलेली नाही.

महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संत ज्ञानेश्वर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातील बडय़ा नेत्याच्या मंडळाकडून गणेशोत्सव साजरा होतो. या उत्सवासाठी चौकातील रस्ता अडवून मंडप उभारण्यात येतो. या मंडपामुळे गणेशोत्सवाच्या काळात वाहने आणि पादचाऱ्यांची कोंडी होते. याबद्दल अनेक नागरिकांना तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र, या मंडळाकडून सर्वच नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी या मंडपासाठी रस्त्यावर काही विशिष्ट अंतरावर खड्डे खोदण्यात आले होते. गणेशोत्सवानंतर मंडप हटवण्यात आला. मात्र, खोदलेले खड्डे बुजवण्यात आले नाहीत. आता या वर्षीचा गणेशोत्सव आला तरीही गतवर्षीचे खड्डे कायम आहेत.

गणेशोत्सवाचे मंडप रस्त्यावरून काढल्यानंतर बांधकामासाठी खणण्यात आलेले रस्त्यावरील हे खड्डे बुजवून पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित मंडळावर होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. या खड्डय़ांची संख्या एक किंवा दोन नसून लहान लहान आकाराचे मिळून तब्बल वीस खड्डे या रस्त्यावर आहेत. तसेच हे खड्डे विशिष्ट अंतरावर खणण्यात आलेले आहेत. त्यामुळे खड्डय़ांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर कारवाई करावी असे नागरिकांची मागणी आहे.

कारवाई का नाही?

मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर खड्डे खोदणाऱ्या मंडळांना प्रत्येक खड्डय़ासाठी दोन हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. मात्र, गेल्या वर्षी दंडाची रक्कम पाचशे रुपये होती. असे असतानाही या मंडळावर कारवाई का झाली नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत.